‘बाहेर गेलेल्या मतदारांना परत येण्यासाठी फोन पे करा, त्यांना जे काही असेल ते पोहोचले पाहिजे,’ आ. संतोष बांगर यांचे वादग्रस्त वक्तव्य


हिंगोलीः बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत येण्यासाठी फोन पे करा, त्यांना सांगा बापू तू आमच्यासाठी यायला लागलास… जे काही असेल ते त्याची सगळी व्यवस्था करू, बाहेरगावची सगळी व्होटिंग आपल्या गावापर्यंत पोहोचली पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना आ. बांगर यांनी मतदारांना जाहीरपणे आमिषे दाखवणारे वक्तव्य केल्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करतो, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आ. संतोष बांगर हे एकनाथ शिंदेंच्या सेनेसोबत गेले आहेत. वादग्रस्त वक्तव्य आणि कृतीमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. आता आ. बांगर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ते बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना आणण्यासाठी फोन पेद्वारे पैसे पाठवण्याचे वक्तव्य करत आहेत.

आ. बांगर यांनी कळमनुरीच्या तोष्णीवाल मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना ‘मार्गदर्शन’ केले. हे मार्गदर्शन करताना त्यांनी बाहेर गावी गेलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट द्या आणि बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना आणण्यासाठी फोन पे करा, असे जाहीर वक्तव्य केले आहे.

 ‘मी तुम्हाला सांगितलं की, बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसात आमच्याकडे आली पाहिजे. त्यांना सांगायचं गाड्या करा. गाड्यांना काय लागंत ते तुम्हाला सांगतो मी त्या पद्धतीनं त्यांना फोन पे, काय ते जे काय असेल ते तुम्हाला सांगतो मी सर्वकाही पोहोचलं पाहिजे. आता दिवाळी आहे. ३ तारखेला दिवाळी माणसं गावात आले तर सहज माणसं दहा-पंधरा दिवस आपल्या घरी राहतात. बराबर आहे?  ते म्हणतील की आम्ही दिवाळी आलो…त्यांना सांगायचं की काय जे असेल बापू, येण्या-जाण्याचे तू आमच्यासाठी यायलास. बाहेरची सगळी व्होटिंग आपल्या गावापर्यंत आली पाहिजे,’ असे आ. संतोष बांगर या व्हायरल व्हिडीओत बोलताना दिसत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना आ. बांगर यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांना जाहीरपणे पैश्याचे आमिष दाखवल्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

स्वतःच जाहीर केली उमेदवारी

महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर होणे बाकी आहे. हे सूत्र जाहीर झाल्यानंतरच महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होईल. परंतु त्याआधीच आ. बांगर यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. आपण येत्या २४ तारखेला दुपारी १२ वाजता शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असे बांगर म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहनही केले आहे.

कारवाईचे धाडस दाखवणार का?: दानवेंचा सवाल

‘..त्यांना सांगा गाड्या करा. त्यासाठी फोन पे वगैरे काय लागेल ते सगळं पोहोचलं पाहिजे..’ हे वाक्य आहे मिंधे गटाचे कळमनुरीतील आमदार संतोष बांगर यांचे. असं उघड पैशांचे अमिश दाखवण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे. यांच्यावर इलेक्शन कमिशन कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का?’ असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!