प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एकमेव उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई


छत्रपती संभाजीनगर: अनुसूचित जमातीची असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर हे आपला छळ करत असल्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांना विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी बडतर्फ केले. विशेष म्हणजे हा बडतर्फीचा आदेश जारी केल्यानंतर कुलसचिवांच्या स्वाक्षरीने बेगमपुरा पोलिसांना पत्र लिहून काही अनुचित प्रकार घडू शकते अशी भीती व्यक्त करत ‘योग्य ती खबरदारी’ घेण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे. एखाद्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना असे पत्र लिहिण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांची विभागीय चौकशी केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्यांना बुधवारी सायंकाळी बडतर्फ केले. ही कारवाई केल्यानंतर कुलसचिवांनी काही अनुचित घटना घडू शकते, त्यामुळे योग्य खबरदारी घ्यावी, असे फर्मान सोडणारे पत्र बेगमपुरा पोलिस ठाण्याला दिले. दरम्यान, सर्व आरोपांचे पुराव्यासह खंडन केल्यानंतर बडतर्फीची केलेली करावाई अन्यायकारक आहे, असे हेमलता ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः Video: अनुसूचित जमातीच्या महिला उपकुलसचिवाने बदलीनंतर स्वतःच्या डोक्यावर वाहून आणले कार्यालयीन बाडबिस्तार, ‘डॉ. बामु’मधील धक्कादायक प्रकार!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कामात कुलसचिव म्हणून खोटी स्वाक्षरी करणे, आस्थापना विभागाच्या पश्चात परस्पर खाजगी एजन्सीशी पत्रव्यवहार करून कार्यीलयीन शिस्तीचा भंग करणे आणि कुलसचिवांना अर्वाच्च व अपमानास्पद भाषेत शिविगाळ करणे असे आरोप ठेवून हेमलता ठाकरे यांची महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील कलम ८ नुसार विभागीय चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस.परांजपे यांच्या मार्फत झाली. या चौकशीअंती ठाकरे यांच्यावरील तिन्ही दोषारोप सिद्ध झाले.

विभागीय चौकशी समितीच्या अहवालानंतर कुलगुरू तथा नियुक्ती व शिस्तविषयक प्राधिकारी डॉ. विजय फुलारी यांनी सेवा नियमानुसार २९ मे रोजी हेमलता ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या नोटीसीला ठाकरे यांनी ८ मे रोजी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्यामुळे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी १० जून रोजी सायंकाळी त्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश काढले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

…पण भूताने पछाडले!

हेमलता ठाकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केल्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांना हेमलता ठाकरे यांचे भूत आपल्या मानगुटीवर बसणार असल्याची भीती सतावू लागली आहे. या कारवाईचे आदेश जारी झाल्याबरोबर कुलसचिवांनी विद्यापीठ प्रशासनाचा ‘हुकुम सर आखों पर’ मानणाऱ्या बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना १० जून रोजी दोन पानी पत्र लिहून हेमलता ठाकरेंचे ‘भूत’ आपल्या मानगुटीवर बसणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.

हेही वाचाः ‘एक तर मी विद्यापीठ सोडावं किंवा जीव अशी परिस्थिती…’ वाचा कुलगुरू आणि कुलसचिवांवर गंभीर आरोप करणारी उपकुलसचिव हेमलता ठाकरेंची सुसाईड नोट

‘यापूर्वी श्रीमती ठाकरे यांनी आत्महत्येचा खोटा बनाव करत आपल्या आत्महत्येस कुलगुरू व कुलसचिव जबाबदार आहेत अशी चिठ्ठी लिहून ठेवून पोलीस प्रशासनाची व कायदा सुव्यवस्थेची दिशाभूल करण्याचा आणि अधिकाऱ्यांना गोवण्याचा गंभीर प्रयत्न केला होता. आज रोजी त्यांना शासकीय सेवेतून अधिकृतपणे बडतर्फ करण्यात आले असल्यामुळे या प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी श्रीमती ठाकरे या पुन्हा एकदा कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर किंवा विद्यापीठातील इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे/तक्रारी दाखल करण्याची किंवा आत्महत्येसारखे कोणतेही अनुचित व कायदेबाह्य पाऊल उचलण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती कुलसचिवांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

हेही वाचाः ‘कोल्हापूरचे पैलवान आणून त्याची चरबी वितळवतो’, कुलगुरू डॉ. विजय फुलारींची अधिसभा सदस्यास धमकी; भयग्रस्त सदस्याने मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण!

‘सदर संवेदनशील बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन  बेगमपुरा पोलीस ठाणे अंतर्गत विद्यापीठ परिसर व संबंधित अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच श्रीमती ठाकरे यांच्याकडून विद्यापीठ प्रशासन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तिची पूर्व चौकशी केल्याशिवाय कोणतीही थेट फौजदारी कारवाई करण्यात येऊ नये. तसेच श्रीमती ठाकरे यांच्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या करिता आपण योग्य ती खबरदारी घ्यावी, असे या फर्मानात म्हटले आहे.

अमृतकरांवर कारवाई का नाही?: ठाकरे

६ मार्चपासून अर्जित रजेवर आहे. प्रशासनाने रजा मंजूर केलेली आहे. सुटीवर असतानाच नियमात नसलेली कारवाई आहे. माझ्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुराव्यासह खंडन केले आहे. तरीही नियमबाह्यपणे थेट सेवेतून काढण्यात आले. माझ्यावर मुलाच्या शिक्षणासह इतर जबाबदाऱ्या आहेत. याचा तरी विचार करायला हवा होता. प्रभारी कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि किरकोळ कारणासाठी माझ्यावर कारवाई केली. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात येईल. तसेच संबंधितांवर मानहानीचाही दावा दाखल केला जाईल, असे हेमलता ठाकरे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!