‘एक तर मी विद्यापीठ सोडावं किंवा जीव अशी परिस्थिती…’ वाचा कुलगुरू आणि कुलसचिवांवर गंभीर आरोप करणारी उपकुलसचिव हेमलता ठाकरेंची सुसाईड नोट


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी बुधवारी कुठल्या तरी गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी ठाकरे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर या दोघांची थेट नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. ‘एक तर मी विद्यापीठ सोडावं किंवा जीव अशी परिस्थिती ते निर्माण करतात, मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे,’ असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनीही आपल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचेही त्यांनी त्यात म्हटले आहे.

उपकुलसचिव हेमलता ठाकरे या बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आपल्या कार्यालयातून विद्यापीठ परिसरातीलच निवासस्थानी पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी सुसाईड नोट लिहिली आणि कुठल्या तरी गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. ही बाब त्यांच्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून त्या बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर बेगमपुरा पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी हेमलता ठाकरे यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट त्यांच्याच शब्दांत…

हेही वाचाः अनुसूचित जमातीच्या महिला उपकुलसचिवाने बदलीनंतर स्वतःच्या डोक्यावर वाहून आणले कार्यालयीन बाडबिस्तार, ‘डॉ. बामु’मधील धक्कादायक प्रकार!

‘आई, अमित, कल्पना आणि श्री तुम्ही मला सर्व माफ करालच अशी आशा करते, कारण मी जगाचा निरोप घेत आहे. खूप कंटाळा आला जगायचा आता. औरंगाबादमध्ये आल्यापासून खूप धावपळ झाली माझी जगताना, संसार करताना आणि ऑफिसचे काम करताना. एक सांगू का आई, संसार करताना जितका त्रास झाला नाही तितका त्रास मला माझ्या ऑफिसमुळे खूप त्रास झाला. ऑफिसमधील अधिकारी वर्ग मुद्दाम मला त्रास देत आहेत. त्यांच्या या सततच्या त्रासामुळे मला आता जगण्याची इच्छा संपली आहे. आता तर ऑफिसमधले विजय फुलारी हे दुसऱ्या विद्यापीठातले सर एक सर आहेत. ते कुलगुरू म्हणून आमच्या विद्यापीठात आले. ते आणि आमच्या विद्यापीठातील एक प्राध्यापक प्रशांत अमृतकर या दोघांनी मिळून गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास द्यायला लागले’.

हेही वाचाः बनावट पदव्यांआधारे मोहम्मद शोएबने पीएचडीला मिळवलेला प्रवेश रद्द, परंतु विद्यापीठाकडून अद्याप पोलिसांत फसवणुकीची फिर्याद नाही!

‘आणि एक सांगू का डॅडी आणि तू सतत सांगत होतात की, सत्य वागायचं, बोलायचं कितीही त्रास झाला तरी ते सहन करायचं. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल से कधीच वागायचं नाही, असं शिकवलं. आई मी तसंच वागले पण तुमच्या संस्कारामुळे माझे बांधले होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून मी ऑफिसचे साहित्य चोरलं म्हणून माझ्यावर पोलिस ठाण्यात केस केली, ते माझ्या मनाला खूपच लागलं. आई मी हा माझ्यावर घेतलेला आळ घेऊन या पुढे नाही जगू शकणार. आई माझ्यानंतर माझ्या श्रीची काळजी घेशील ना? तू जिवंत असेपर्यंत तुझ्याजवळ त्याला ठेव, मला बरं वाटेल. त्याला माझी उणीव जाणवू देऊ नकोस. तो आता खरा पोरका होईल आईबाबाविना.’

हेही वाचाः बोगस पदव्यांच्या रॅकेटची व्याप्ती मराठवाडाभर?: वाराणसीतील विद्यापीठाच्या बोगस पदव्यांवर आणखी एका महाभागाने मिळवला पीएचडीला प्रवेश

‘मी ऑफिसमध्ये खूपच प्रामाणिकपणे काम केलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आई आज मी एकटी जीवन जगत आहे जोडीदाराशिवाय हे सुद्धा माझ्या ऑफिसमधल्या लोकांना माहिती होतं. ऑफिसच्या वरच्या अधिकाऱ्यांना पण या दोघांच्या तक्रारी केल्या पण मला त्रास देणारे विजय फुलारी यांचे पोलिसमध्ये कोणीतरी खूप मोठ्या पदावर त्यांचा नातेवाईक आहे आणि त्यांचे सगळ्या ऑफिसमध्ये आणि मंत्रालयात मित्र व नातेवाईक आहेत. हे मला कधीच मदत करणार नाहीत आणि प्रशांत अमृतकर याचे पण आहेत. त्यामुळे त्यांचं कोणीच काही करू शकत नाही. माझ्या तक्रारीची दखल ना पोलिसांनी घेतली ना विद्यापीठाचे वरच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यांच्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही. पण मला यापुढे अजून खूप त्रास द्यायला सुरूवात करतील. मग आता जगून काय करू? यांना देव कधीच माफ करणार नाही.

‘यांनी मला त्रास द्यायचं हे यांनी मला त्रास द्यायचं हे या दोघांनी ठरवलेलंच आहे. म्हणून मला नोटीसवर नोटीस ते देत आहेत. काल मी शेवटच्या नोटीसचं पत्र त्यांना दिलं. ते मला नोटीस यासाठी देतात की मी त्रस्त व्हावी आणि मी एकतर विद्यापीठ सोडावं किंवा जीव अशी परिस्थिती ते निर्माण करतात. मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे. पण आई तुझी काळजी घे. तुझं आणि कल्पनाचं मन खूप कोमल आहे. माझ्यानंतर एकमेकांची काळजी घ्या. अमितच्या जास्त नादी लागू नका. त्याला जसं जगायचं तसं जगू द्या’.

‘आई, डॅडी मला माफ करा. डॅडी मी येतीय तुमच्याकडे तुम्हाला भेटायला. श्री बाळा काळजी घे. यानंतर तुला आजीकडे राहयला जावं लागेल. मला माहीत आहे तुला आता बापानंतर माझं पण प्रेम मिळणार नाही. आजीला त्रास देऊ नकोस. तू पोरका होत आहेस याची मला कल्पना आहे. याला माझ्या ऑफिसमधले संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत. बस बाळा आता थांबते. एकमेकांची काळजी घ्या.’

उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांना विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून कसा त्रास दिला जात आहे, हे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आता पोलिसांकडून जेव्हा त्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्या जबाबातही त्यांनी या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे घेतली तर पोलिसांकडून कुलगुरू डॉ. फुलारी आणि कुलसचिव डॉ. अमृतकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हेमलता ठाकरे यांनी यांनी कही दिवसांपूर्वीच पोलिसांकडे या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. पण त्या तक्रारीवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!