
नवी दिल्लीः पाकिस्तान समर्थित दहशतावाद्यांनी जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना बुधवारी (७ मे) स्वसंरक्षणासाठीचा युद्ध सराव म्हणजेच शत्रुच्या हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठीचा मॉक ड्रील करण्याचे निर्देश दिले आहेत. १९७१ नंतर प्रथमच देशात अशाप्रकारचा मॉक ड्रील होत असून या मॉक ड्रीलमध्ये महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने मॉक ड्रील म्हणजेच स्वसंरक्षणासाठीचा युद्ध सराव घ्यावयाच्या शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार देशातील २४४ नागरी संरक्षण जिल्ह्यातील ( सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट) २५९ ठिकाणी उद्या ७ मे रोजी मॉक ड्रील घेतला जाणार आहे. मॉक ड्रील घ्यावयाच्या ठिकाणांची सामरिकदृष्ट्या महत्वानुसार तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत देशातील अतिसंवेदनशील १३ ठिकाणे, दुसऱ्या श्रेणीत २०१ ठिकाणे आणि तिसऱ्या श्रेणीत ४५ शहरांचा समावेश आहे.
पहिल्या श्रेणीत महाराष्ट्रातील मुंबई, उरण आणि तारापूर या तीन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई हे देशाचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे. उरण येथे मालवाहतूक करणार महत्वाचे जेएनपीटी बंदर आहे तर तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणांचा समावेश अतिसंवेदनशील श्रेणीत करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होणार मॉक ड्रील?
- श्रेणी १: मुंबई, तारापूर. उरण
- श्रेणी २: ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी चिंचवड
- श्रेणी ३: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मॉक ड्रील हे युद्धाचे संकेत?
हा युद्धसराव म्हणजेच मॉक ड्रील संघर्षाचे संकेत नसून नागरी संरक्षण कायदा १९६८ नुसार शीत युद्धाच्या काळात किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण कसे करायचे? यासाठीचा नियमित सराव आहे. युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास आपण त्यासाठी कितपत तयार आहोत? हे या सरावातून दिसणार आहे, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या युद्धसरावात हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या सायरनची चाचणी आणि हवाई हल्ल्या झाल्यास नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा? क्रॅश ब्लॅकआऊट म्हणजेच एकाचवेळी मोठ्या प्रदेशात लाइट जाऊन अंधार झाल्यास काय करायचे? कठीण परिस्थितीत स्वतःची आणि इतरांची मदत कशी करायची? याबाबतचे प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रील हा केवळ एक सराव नाही तर हे एक प्रशिक्षण आहे.
या पाच गोष्टींवर भर
- सायरनः शत्रूने हवाई हल्ला केला किंवा शत्रूकडून हवाई हल्ला होणार आहे, हे नागरिकांना कळावे यासाठी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील.
- प्रशिक्षणः शत्रूने हल्ला केल्यास नागरिक आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव कसा करायचा? याचे प्रशिक्षण या मॉक ड्रीलमध्ये दिले जाईल.
- ब्लॅकआऊटः शत्रूकडून हल्ला झाल्यास त्वरित सर्व विद्युत पुरवठा तत्काळ बंद करण्याची व्यवस्था आहे की नाही, याची चाचणी घेतली जाईल.
- महत्वाची ठिकाणेः महत्वाची ठिकाणे व इमारती शत्रूच्या नजरेच पडणार नाहीत, यासाठी ती ठिकाणे झाकली जातील.
- स्थलांतरः शत्रूकडून संकट आलेच तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कसे घेऊन जायचे, यासाठीचा सराव केला जाईल.
कोणाकोणाच सहभाग?
या मॉक ड्रीलमध्ये सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, स्थानिक पोलिस, स्थानिक प्रशासन, होम गार्ड्स, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटनेचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता आहे.
मॉक ड्रीलमध्ये काय होईल?
या युद्धसरावादरम्यान ब्लॅकआऊट म्हणजेच विद्युत पुरवठा खंडित केला जाऊ शकतो. हवाई हल्ल्याची सूचना देणारे मोठ्या आवाजातील सायरन वाजत असल्याचा आवाज येऊ शकतो. काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी केली जाऊ शकते तर काही ठिकाणची वाहतूक वळवली जाऊ शकते.
