नवी दिल्लीः अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच एससी आणि एसटीच्या आरक्षणात उपवर्गीकरण तसेच क्रिमी लेअर लागू करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ उद्या, २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आरक्षण बचाव संघर्ष समिती तसेच विविध दलित संघटनांनी ही बंद हाक दिली आहे. या भारत बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे.
मंगळवारी, २१ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा भारत बंद राहील. या बंदला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. या भारत बंदच्या काळात सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आस्थापना, खासगी ऑफिसेसही बंद राहण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनाही सुटी दिली जाण्याची शक्यता आहे. बंदच्या काळात बँका आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना जारी झालेल्या नसल्यामुळे बँका आणि सरकारी कार्यालये सुरू राहण्याची शक्यता आहे.
बंदच्या काळात आपत्कालीन सेवा सुरु रहातील. ऍम्बुलन्स, रूग्णालये, मेडिकल स्टोअर्ससह वैद्यकीय सेवा यासारख्या तातडीच्या आणि आपत्कालीन सेवा सुरू रहाणार आहेत. या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्यांचे गृह सचिव आणि पोलिस प्रमुखांनी बैठका घेऊन भारत बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्याच्या आवश्यक त्या सूचना दिल्या.
अनुसूचित जाती-जमातींचे उपवर्गीकरण करण्याचा तसेच या आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्याला गरज आहे, त्यालाच आरक्षणात प्राधान्य मिळावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात एससी-एसटीमध्ये प्रचंड असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठीच उद्या मंगळवारी, २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.