मुंबईः मुंबई पोलिसांच्या हद्दीत आता भाडेकरू ठेवण्यासाठी पोलिसांच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज नाही, असे आदेश मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी जारी केले आहेत. तसे बदल मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवरही करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या या निर्णयामुळे भाडेकरू नोंदणीच्या नावाखाली मध्यस्थ आणि दलालांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लुटीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
घर किंवा जागा भाड्याने देण्यासाठी आता मुंबई पोलिसांच्या कोणत्याही नाहरकत प्रमाणपत्राची गरज नाही. नागरिकांना घर/जागा भाड्याने दिल्याबद्दल माहिती मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाद्वारे देता येईल किंवा संबंधित पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे हा अर्ज पाठवता येऊ शकेल.
ऑनलाइन अर्जाद्वारे ही माहिती देताना ओटीपी घरमालकाच्या संपर्क क्रमांकावर येईल. संकेतस्थळावर पुरवण्यात आलेली माहिती सत्य असल्याची खात्री घरमालक आणि भाडेकरूंनी करावी, असे मुंबईचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी म्हटले आहे. पोलिसांना खोटी माहिती पुरवणे ही गुन्हा असून त्यामुळे अर्जामध्ये पुरवण्यात आलेल्या माहितीत तफावत आढळून आल्यास संबंधित भाडेकरू तसेच घरमालकावर कारवाई केली जाऊ शकते, असेही प्रशांत कदम यांनी म्हटले आहे.
भाडेकरू नोंदणीच्या नावाखाली मुंबईत मध्यस्थ आणि दलाल घरमालकांची मोठ्या प्रमाणावर लूट करतात. मुंबई पोलिसांच्या हद्दीत संबंधित पोलिस ठाण्याकडून भाडेकरू ठेवण्यासाठीचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावाखाली हे मध्यस्थ आणि दलाल पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता भाडेकरू नोंदणीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरही त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरमालकांची मध्यस्थ आणि दलालांकडून होणारी लूट थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.