मुंबईः शिवसेनेला भगदाड पाडून केवळ ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सगळे काही आलबेल नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्याच विरोधात दंड थोपटले असून येत्या ३० जानेवारी रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात न घेतल्यामुळे बच्चू कडू यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे.
आमदार बच्चू कडू यांनीच आज विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. या निवडणुकांसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून मेहनत करत आहोत. तीन ठिकाणी आम्ही प्रचंड मतनोंदणी केली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विचारात घेऊन उमेदवार उभा करावा. शिंदे गट, प्रहार जनशक्ती पक्ष आणि भाजप अशी युती करून उमेदवार द्यावेत, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे आम्ही पाचही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.
केवळ अमरावतीच नव्हे तर येत्या ३० जानेवारी रोजी होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मराठवाड्यातून डॉ. संजय तायडे, अमरावतीतून किरण चौधरी, कोकण विभागातून नरेश कौंडा, नागपुरातून अतुल रायकर आणि नाशिकमधून सुभाष झगडे हे उमेदवार असतील. या पाचपैकी एक ते दोन जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकूच, असा विश्वासही बच्चू कडू यांनी बोलून दाखवला आहे.
बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती विरूद्ध भाजप- शिंदे गट असा सरकारमध्ये सहभागी पक्षातीलच सामना पहायला मिळणार आहे. आमदार बच्चू कडू हे आधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. भाजपच्या गळाला लागून एकनाथ शिंदे शिवसेनेत उभी फूट पाडून ४० आमदारांना फोडून गुवाहटीला घेऊन गेल्यानंतर बच्चू कडूही गुवाहटीला गेले आणि त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला. आता तेच बच्चू कडू विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.