
नवी दिल्लीः जम्मू-काश्मिरातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोदरार प्रत्युत्तर देत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले चढवत हे अड्डे उद्धवस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेअंतर्गत मध्यरात्रीनंतर झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून तेथील रूग्णालयांत मेडिकल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाने मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत एन्ट्री केली आणि अवघ्या २३ मिनिटांत म्हणजे रात्री १ वाजून ५१ मिनिटांनी मोहीम फत्ते करून भारताची लढाऊ विमाने भारताच्या भूमीत माघारी परतली. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्यदलावर कोणतीही कारवाई केली नाही. दहशतवाद्यांचा नायनाट करणे हाच आमचा हेतू असल्याचे भारतीय सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान णि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या मूलभूत ठिकाणांवर हल्ले केले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. ज्या ठिकाणांवरून भारतावर दहशतवादी हल्ल्याची योजना तयार करण्यात आली त्या नऊ ठिकाणांवर रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी हवाई हल्ले करण्यात आले.
हवाई हल्ले केलेली हिच ती ९ ठिकाणे
- मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर- जैश-ए-मोहम्मद
- मरकज तैयबा, मरीदके- लश्कर-ए-तोएबा
- सरजल, तेहरा कलां- जैश-ए-मोहम्मद
- महमूना जोया, सियालकोट- हिज्बुल मुजाहिदीन
- मरकज अहले हदीस, बरनाला- लश्कर-ए-तोएबा
- मरकज अब्बास, कोटली- जैश-ए-मोहम्मद
- मस्कर राहील शाहीद, कोटली- हिज्बुल मुजाहिदीन
- शावई नाला कॅम्प, मुजफ्पराबाद- लश्कर-ए-तोएबा
- सैयदना बिलाल कॅम्प, मुजफ्फराबाद- जैश-ए-मोहम्मद
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीनसारख्या भारतविरोधी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानची इंटर सर्विसेस इंटेलिजन्स (आयएसआय) एजन्सीकडून गुप्त मदत मिळत आहे. या मदतीत समन्वित वित्तीय सहाय्य, रसद, सैद्धांतिक आणि लष्करी मदतीबरोबरच प्रत्यक्ष युद्ध प्रशिक्षणही देण्यात येत आहे. पाकिस्तानचे सैन्य अधिकारी नियमितपणे या दहशतवादी संघटनांकडून चालवण्यात येत असलेल्या प्रशिक्षण शिबिरांचे दौरे करत आहेत आणि तेथील प्रशिक्षण सत्रांची निगरानी करत आहेत.
जागतिक चौकशीपासून वाचण्यासाठी आणि आपल्या दहशतवादाला स्वदेशी प्रतिकार चळवळ भासवण्यासाठी द रेजिस्टेंस फ्रंट (टीआरएफ), पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ), काश्मीर टायगर्स (केटी) आदी नावांनी पुनःश्च ब्रँडिंग करण्यात आले आहे. या समूहांना मुख्य समर्थन सरकारी सुविधांमध्येच असलेल्या मूलभूत संरचनेच्या रुपात देण्यात येत आहे. ऑपरेश सिंदूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेली अनेक प्रशिक्षण शिबिरे आणि लाँच पॅड सध्या पाकिस्तानी सैन्य प्रतिष्ठाने आणि छावणी क्षेत्राच्या जवळच चालवली जात आहेत.
या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानी सैन्य दलाच्या स्तराची दळणवळण उपकरणे देण्यात आली आहेत. सरजाल-तेहरा कलांसारख्या दहशतवादी अड्ड्यांवर उच्चपातळीचा दळणवळण सेटअप आहे. त्याचा वापर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत योजना तयार करण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी करण्यात येत आहे.
धार्मिक विचारधारा आणि पैसा, प्रचार आणि भरतीसारख्या अन्य सहाय्यक बाबी पाकिस्तानमध्ये असलेल्या सुविधांमधून संस्थात्मक पाठिंब्यानेच केल्या जात आहेत. ही ठिकाणे केवळ दहशतवादी कमांडरांची निवासस्थाने म्हणूनच काम करत नाहीत तर कट्टरपंथ, हेरगिरी आणि शस्त्रास्त्रे चालवण्याची प्रशिक्षण केंद्रे म्हणून चालवली जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
भारत म्हणतोः प्रत्युत्तराचा अधिकार वापरला!
या हवाई हल्ल्यानंतर भारत सरकारने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडकर व्योमिका सिंह, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्या गुप्त माहितीनुसार भारताच्या विरोधात आणखी हल्ले होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे हे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सीमेपलिकडील दहशतवाद रोखण्यासाठी प्रत्युर देण्याच्या अधिकाराचा भारताने वापर केला. आमची कारवाई तोलून मापून जबाबदारीची होती. दहशतवाद्यांच्या मूलभूत अड्डे उद्धवस्त करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले, असे भारताच्या वतीने सांगण्यात आले.
