मेहकर मतदारसंघात वाटण्यासाठी ४० खोके आलेः ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकरांनी टाकलेल्या ‘खोके बॉम्ब’मुळे खळबळ


मेहकरः मेहकर विधानसभा मतदारसंघात वाटण्यासाठी ४० खोके आले आहेत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पोलिसांनो धाडी टाकाल का? असा सवाल बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना करत माझे म्हणणे आहे की धाडी टाकू नका, हा पैसा वाटून खा, खिशात घालून मोकळे व्हा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. मेहकर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार ऋतूजा चव्हाण यांच्या प्रचारासाठी मेहकरमधील उर्दू शाळा क्रमांक ३ परिसरातील स्वतंत्र मैदानावर झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी हा ४० खोक्यांचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मेहकरमध्ये वाटण्यासाठी ४० खोके आणलेल्या पक्षाचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख महायुतीकडेच होता.

मेहकर मतदारसंघात एक एक मत दहा हजार रुपयाला विकले जाण्याची शक्यता आहे. कारण कुठे कुठे ४० कोटी रुपये आलेत, याची मला माहिती मिळाली आहे. मेहकरमध्येही ४० कोटी रुपये आले आहेत. ते कुठे कुठे आहेत, याची संपूर्ण माहिती मला आहे, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.

पोलिसांनो, धाडी टाकाल का? मी यादी देतो, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणातून सभेच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना केला. परंतु माझे म्हणणे आहे की, धाडी टाकू नका, हा पैसा वाटून खा. खिशात घालून मोकळे व्हा, असे प्रकाश आंबेडकर पोलिसांना उद्देशून म्हणाले.

त्यांनी कितीही पैसे वाटले तरी खुशाल वाटू द्या, पण मतदान मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार ऋतूजा चव्हाण यांनाच करा. उद्याच्या पिढीचे अधिकार कायम ठेवायचे असतील तर वंचितला मत द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर ’५० खोके एकदम ओके’ असा नारा खूपच गाजला होता. या बंडानंतर विधिमंडळाच्या परिसरापासून ते शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीरसभा, पत्रकार परिषदा आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही पन्नास खोकेचा नारा चांगलाच गाजला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या (उबाठा) नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ‘खोके’ चर्चेत आणले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी टाकलेल्या खोका बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *