विधानसभा निवडणुकीचा काय निकाल लागणार? कोणाची सत्ता येणार?; वाचा प्रसिद्ध ग्लोबल इन्व्हेस्टर,राजकीय भाष्यकार रुचिर शर्मांचा मोठा दावा


मुंबईः महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? आणि कोणाची सत्ता येणार? याबाबत केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील जनतेलाही कमालीची उत्सुकता लागलेली आहे. अशातच प्रसिद्ध ग्लोबल इन्व्हेस्टर, लेखक आणि राजकीय भाष्यकार रुचिर शर्मा यांनी महाराष्ट्र  विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल, असा अंदाज ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे मांडला आहे.

प्रसिद्ध ग्लोबल इन्व्हेस्टर, लेखक आणि राजकीय भाष्यकार रुचिर शर्मा यांनी  ‘इंडिया टुडे’शी बोलताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे नेमके काय चित्र असेल? याबाबतचा तर्क काही तथ्ये देत मांडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीच्याच निकालाची पुनरावृत्ती होईल. झारखंडमध्येही तेच चित्र असेल, असे रुचिर शर्मा यांनी म्हटले आहे.

‘भारतातील निवडणुकांमध्ये एक प्रकारचा पॅटर्न दिसतो. ज्या ज्या वेळी भारतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ६ ते १२ महिन्यांच्या अंतरात घेतल्या जातात, तेव्हा राज्यातील निवडणुकांमध्ये लोकसभेचाच ट्रेंड पहायला मिळतो. अशा परिस्थितीत राष्ट्रीय निवडणुकीतील ट्रेंडचीच राज्यांच्या निवडणुकातही नेहमी पुनरावृत्ती होते,’ असे रुचिर शर्मा यांनी म्हटले आहे. या पॅटर्नला त्यांनी रिकरिंग ट्रेंड म्हणजेच आवर्ती प्रवृत्ती’ म्हटले आहे.

नुकत्यात झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणूक निकालावर काय परिणाम होईल?, असे विचारले असता रूचिर शर्मा म्हणाले की, मोमेंटम (गती) आणि लोकप्रिय मत (पॉप्युलर ओपिनियन) काही वेगळे संकेत देऊ शकतात, परंतु भारतातील प्रत्येक राज्याची निवडणूक ही वेगळी असते, असे शर्मा म्हणाले.

माझा या गती सिद्धांतावर (मोमेंटम थिअरी) विश्वास नाही. जर मोमेंटम असता तर हरियाणामध्ये भाजपचा विजयच झाला नसता, कारण तेथील मोमेंटम भाजपच्या विरोधात होता. भारतातील प्रत्येक राज्याच्या निवडणुका स्वाभाविकतःच वेगवेगळ्या असतात. प्रत्येक राज्याच्या मतदानाच्या वर्तनावर राष्ट्रीय भावना विचारात न घेता प्रादेशिक मुद्द्यांचाच प्रभाव असतो, असे रूचिर शर्मा म्हणाले.

रूचिर शर्मा यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील निकालाचाही संदर्भ दिला. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. हाच ट्रेंड विधानसभा निवडणुकीतही कायम राहू शकतो, असे रुचिर शर्मा म्हणाले. माझे हे मत अलीकडील क्षेत्रीय निरीक्षणांवर आधारित नसून ऐतिहासिक पॅटर्नवर आधारित आहे, असे रुचिर शर्मा यांनी जोर देऊन सांगितले.

हरियाणात आतापर्यंतचा सर्वात विचित्र निकाल

रूचिर शर्मा यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे वर्णन ‘भारतात मी पाहिलेला कदाचित सर्वात विचित्र निवडणूक निकाल’ असे केले. पत्रकारांपासून ते राजकीय पक्षांतील लोकांपर्यंत कुणीही प्रत्यक्ष निकालाची अपेक्षा केली नव्हती. हरियाणाहून परतलेल्या कोणत्याही पत्रकाराने ‘अरे वेगळे काही होऊ शकते,’ असे म्हटलेले नाही. एवढेच नव्हे तर भाजपमधील लोकांनाही या अनपेक्षित बदलाचा अंदाज नव्हता, असे रूचिर शर्मा म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!