मुंबईः बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असा दावा भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
१९९२ मध्ये आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आता ३१ वर्षे पूर्ण होत आली असली तरी त्यावरून निर्माण झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिदी संदर्भात निर्णय दिला आणि आयोध्येत राम मंदिराची बांधणीही सुरू झाली असली तरी हा वाद अद्याप सुरूच आहे.
भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्याविषयी नव्याने दावा केला आहे. झी २४ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशीद पाडण्याचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा काहीही संबंध नाही, असा दावा या मुलाखतीत केला आहे.
… ते कदापि शिवसैनिक नव्हते!
‘… त्यावेळी ढाचा पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले की होय, मी याची जबाबदारी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तेथे गेले होते की शिवसेना तेथे गेली होती की बजरंग दल तेथे होते?’ कारसेवक कोण होते? हे जनरलाईज करण्याची गरज नाही. कारसेवक हिंदू होते. हे कारसेवक बजरंग दलाच्या नेतृत्वात गेले होते. आम्ही बजरंग दलाचे नाव घेणार नाही, असे ते म्हणत नव्हते. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केले होते, की हेच करू शकतील आणि त्यांनी ते केले. ज्यांनी बाबरी पाडली ते कदापिही शिवसैनिक नव्हते’, असे चंद्रकांत पाटील यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
तुम्ही काय तेथे सरदार पाठवले होते का?
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, आता विधान परिषदेत असणारे हरेंद्र कुमार आणि मी असे तीन राष्ट्रीय सरचिटणीस सगळी व्यवस्था बघायला महिनाभर तेथे होते. आम्हाला असे सांगितले होते की, बाबरी पडो अथवा न पडो, शेवटचा माणूस बाहेर पडल्यानंतर तुम्ही तिघांनी बाहेर पडायचे. जेव्हा आम्ही तिघे बाहेर पडलो, तेव्हा अयोध्येच्या त्या रस्त्यावर कुत्री भुंकत होती. अशा वातावरणात आम्ही काम केले. त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे तुम्ही काय तुमचे सरदार पाठवले होते का तेथे? असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
…तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या: राऊत
दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी टिकास्त्र सोडले आहे. अयोध्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीत हिंदुत्वाची मशाल पेटली रहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष आणि त्याग देशाला माहीत आहे. त्याच त्यागातून आजचा भाजप निर्माण झाला आहे. बाबरी कांडानंतर बाळासाहेब ठाकरे लखनौला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर झाले होते. त्यातले ते प्रमुख आरोपी आहेत. हे भाजपच्या नेत्यांना माहीत नाही का? ज्यांना तुम्ही विकत घेतले आहे, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलेय? असे राऊत म्हणाले.
अयोध्या आंदोलनात शिवसेना नव्हतीच हा दावा भाजप करत आहे. शिंदे यांना हा दावा मान्य आहे? नसेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा. मिंधे गटात कोणी खऱ्या आईचे दूध प्यायलेला आहे का जो शिवसेनाप्रमुखांच्या अपमानाविरोधात राजीनामा देईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
‘शिंदे आणि ४० लोकांना हा दावा मान्य आहे का?’
बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीला शिलेदार पाठवले नव्हते, असे चंद्रकांत पाटील म्हणतायत. आता यावर जे काही त्यांच्या मांडीला मांडी किंवा अजून काय लावून सरकारमध्ये बसले आहेत आणि काल त्यांच्या चड्डीची नाडी पकडून अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते, त्या मिस्टर डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या ४० लोकांचे काय म्हणणे आहे? आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार वगैरे जे तीर ते मारत असतात त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे, असेही राऊतांनी म्हटले आहे.