
मुंबईः ‘माझ्या नजरेने पाहिले तर महिला काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात,’ असे वादग्रस्त विधान करणारे रामदेव बाबा उर्फ रामकिसन यादव यांना राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर उपरती झाली असून केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी महिलांची सपशेल माफी मागितली आहे.
ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा ऊर्फ रामकिसन यादव यांनी महिला साडीत चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत हे विधान केले होते. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावरून वादंग उठले आणि सर्वस्तरातून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.
रामदेव बाबा उर्फ रामकिसन यादव यांच्या या वक्तव्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रामदेव बाबांना नोटीस पाठवून दोन दिवसांत खुलासा करण्यास बजावले होते. त्यावर रामदेव बाबांनी राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून सपशेल माफीनामा सादर केला आहे.
बाबा रामदेव उर्फ रामकिसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ रामकिसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटीस पाठवली होती. याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
काय म्हटलेय माफीनाम्यात?: महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ नुसार मी कथितरित्या कोणताही अपराध केलेला नाही. मी आई आणि मातृशक्तीचा सदैव गौरवच केला आहे. माझ्या एक तासाच्या भाषणात मातृशक्तीचा गौरवच आहे. परंतु एक शब्द कपड्यांबाबतीतही बोललो. त्याचे तात्पर्य माझ्यासारखे साधे कपडे असे होते. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याचा अत्यंत खेद आहे. माझ्या शब्दामुळे त्यांच्या भावना दुखवल्या असतील, त्या सर्वांची मी निरपेक्ष आणि स्वस्तीभावाने माफी मागतो, असे रामदेव बाबांनी राज्य महिला आयोगाकडे सादर केलेल्या खुलाश्यात म्हटले आहे.