औरंगाबादः विद्यापीठ सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू, आधी लागणार आरक्षित प्रवर्गातील निकाल

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गणातून निवडून द्यावयाच्या १० अधिसभा सदस्यांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरूवात झाली आहे. सध्या आरक्षित प्रवर्गातील मतमोजणी हाती घेण्यात आली. सुरूवातीला या गणातील वैध-अवैध मते ठरवली जातील आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणी केली जाईल.

पदवीधर गणातून निवडून द्यावयाच्या १० अधिसभा सदस्यांच्या निवडीसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर शनिवारी मतदान घेण्यात आले होते. एकूण ३६ हजार २५४ नोंदणीकृत पदवीधर मतदारांपैकी १८ हजार ४०० मतदारांनी शनिवारी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात १५ हजार १७५ पुरूष तर ३ हजार २२५ महिला मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत सरासरी ५०.७५ टक्के मतदान झाले आहे.

आज सकाळी दहा वाजता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान असल्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया जवळपास ४८ तास चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मतमोजणीचा पहिला निकाल हाती येण्यासाठी सायंकाळचे सात वाजण्याची शक्यता आहे.

ही मतमोजणी किचकट आणि वेळखाऊ असल्यामुळे मतमोजणीसाठी प्रत्येक सत्रात ४० प्राध्यापक, अधिकारी, कर्माचारी असे १२० कर्मचारी नेमण्यात आले आहे. तीन सत्रांमध्ये मतमोजणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्रावर १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. १० जागांसाठी एकूण ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!