राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात निदर्शने, आरएसएस ही धार्मिक संघटना असल्याचे भाजप सरकारनेच केले मान्य!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कोणतीही कायदेशीर नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांकडून छत्रपती संभाजीनगरातील महाविद्यालयांच्या परिसरात राबवण्यात येत असलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेला विरोध केला म्हणून आंबेडकरी कार्यकर्त्यांविरुद्ध धार्मिक तेढ निर्माण केल्याचे गुन्हे पोलिसांनी दाखल केल्यामुळे आरएसएसविरोधात जनक्षोभ उफाळण्यास सुरूवात झाली असून आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छत्रपती संभाजीनगरातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विनापरवानगी सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येत होती. १४ ऑक्टोबर रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात ही सदस्य नोंदणी मोहीम सुरू असल्याचे कळताच आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाहुळ यांनी ही नोंदणी मोहीम बंद पाडली. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रकारे विनापरवानगी सदस्य नोंदणी करणे बेकायदेशीर आहे. आरएसएसच नव्हे तर कोणत्याही धार्मिक संघटनांनी शाळा-महाविद्यालय परिसरात धार्मिक अजेंडे राबवून निकोप शैक्षणिक वातावरण गढूळ करू नये, अशी भूमिका मांडत विजय वाहूळ यांनी ही सदस्य नोंदणी मोहीम हाणून पाडली होती.

या घटनेनंतर उस्मानपुरा पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी विजय वाहुळ यांच्या विरोधात स्वतःच फिर्यादी होत धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आणि विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला. विजय वाहुळ यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरात आरएसएसविरुद्ध असंतोष उफाळून आला असून सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांनी एकत्र येत आज क्रांती चौकात आरएसएसवर तत्काळ बंदी घालण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. आरएसएस ही धार्मिक द्वेष पसरवणारी संघटना असून गेल्या १०-११ वर्षांपासून या संघटनेने आक्रमकपणे धार्मिक द्वेष पसरवण्यास सुरुवात केल्यामुळे देशातील दलित, मुस्लिम, ख्रिश्चनांबरोबरच आधार वंचितांवरील द्वेषपूर्ण हल्ल्यांची संख्या आणि गांभीर्य वाढले आहे. आरएसएसचा इतिहासच दहशतवादी आणि समाजविघातक कारवायांचा असून देशातील सामाजिक व धार्मिक सौहार्द्र कायम राखण्यासाठी तसेच देशाची एकता व संविधान वाचवण्यासाठी आरएसएसवर तत्काळ बंदी घालावी, असे पोलिस आयुक्तांमार्फत राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दिनकरदादा ओंकार, मिलिंद दाभाडे, रमेशभाई खंडागळे, गौतम लांडगे, कृष्णा बनकर, गौतम खरात, प्रकाश निकाळजे, रमेश गायकवाड, मुकुंद सोनवणे, विजय वाहुळ इत्यादींसह विविध आंबेडकरी पक्ष व संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी आरएसएसविरोधी घोषणाबाजी करत क्रांती चौक दणाणून सोडला. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी झालेले हे नजीकच्या काळातील पहिलेच आंदोलन असल्यामुळे या आंदोलनाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

आरएसएस सांस्कृतिक नव्हे, धार्मिक संघटना!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस ही सांस्कृतिक संघटना असल्याचा दावा करते. परंतु ती सांस्कृतिक संघटना नसून धार्मिक संघटना असल्याचे पोलिसांनी म्हणजेच सरकारनेच आंबेडकरी कार्यकर्त्यांविरुद्ध आरएसएसच्या सदस्य नोंदणीला विरोध करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचे गुन्हे दाखल करून मान्य केले आहे. आरएसएसच्या सदस्य नोंदणीला विरोध केल्यामुळे उस्मानपुरा आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यात पोलिस म्हणजे सरकार फिर्यादी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य नोंदणी सुरू असताना आरोपींनी तेथे उभा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इसमाला त्याचे बॅनर व टेबल काढून घेण्यासाठी जबरदस्ती करून ‘आंबेडकरी चळवळ धडा शिकवेल या सगळ्यांना, मारेल भडव्यांना अशा प्रकारचे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने, हेतुपुरस्सर, दुष्टबुद्धीने सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला’ असे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, २९९, ३५२, ३५, १(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य नोंदणीला विरोध करणे हे धार्मिक तेढ करणारे कृत्य असल्याचे नमूद करून पोलिसांनी म्हणजे सरकारनेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धार्मिक संघटना असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत, या आरएसएसच्या दाव्यातील फोलपणा स्पष्ट झाला आहे. एखाद्या सांंस्कृतिक संघटनेच्या सदस्य नोंदणीला विरोध करणे ही धार्मिक तेढ निर्माण करणारी कृती कशी होऊ शकते? असा सवाल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते करू लागले आहेत.

आरएसएस कचेरीवर उद्या ‘वंचित’चा मोर्चा

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य नोंदणीला विरोध केल्यामुळे दोन आंबेडकरी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या (२४ ऑक्टोबर) क्रांतीचौकातून आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा नेण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरीही हा जनआक्रोश मोर्चा निघणारच अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. दुपारी १२ वाजता क्रांती चौकातून हा मोर्चा निघेल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!