
मुंबईः सुमारे दोन आठवड्यानंतर मोसमी वाऱ्यांची आगेकूच पुन्हा सुरू झाली असून २८ जूनपर्यंत कोकणष मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र विदर्भातील जिल्ह्यांत मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच पुन्हा सुरू झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुणे, सोलापूर, अलिबाग या भागात दाखल झाले आहेत. येत्या ४८ तासांत नैऋत्य मोसमी वारे मुंबईसह राज्याचा आणखी काही भाग व्यापू शकतात, अशी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरी सीमा पुणे, अलिबाग, निझामाबाद, दंतेवाडा, सुंदरगढ, गया, मुझफ्फरपूरपर्यंत पोहोचली आहे. येत्या ४८ तासांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आणखी प्रगती होण्यासाठी अनुकुल स्थिती आहे. परिणामी मुंबईसह राज्याचा उर्वरित भाग, तेलंगण, ओडिशा, छत्तीसगडचा काही भाग, बिहार, झारखंड असा भाग मोसमी वारे व्यापू शकतात, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार २८ जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ताशी ४० ते ५० किलो मीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
कसे असेल पाऊसमान?
सोमवार, २२ जूनः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, या जिल्ह्यात ताशी ४० ते ५० आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटास हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता असून अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे.
मंगळवार, २३ जूनः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, नंदूरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची तर अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.
बुधवार, २४ जूनः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची तर पालघर, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.
गुरूवार, २५ जूनः रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह काही ठाकणी मुसळधार तर रायगड, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा या भागात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.
शुक्रवार, २६ जूनः रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा भागासह काही ठिकाणी मुसळधार तर रायगड, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा भागात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
