ओमराजे निंबाळकरांसह ठाकरेंचे ६ फुटीर खासदार शिंदेसेनेत, उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत एकनाथभाईंकडून आणखी धमाक्याचे संकेत!


मुंबई: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ फुटीर खासदारांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. जून २०२२ मध्ये आम्ही पहिला उठाव केला. आता उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी धमाक्याचे संकेत दिले. त्यामुळे नजीकच्या काळात ‘ऑपरेशन टायगर’चा आणखी एक भाग पहायला मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि उत्तर-पूर्व मुंबईचे खीसदार संजय दिना पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांनी आज पक्षांतर करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
शिवसेना हे कुटुंब असून कट्टर शिवसैनिक खासदार आमच्या सोबत आले आहेत, याचा आनंद आहे, असे सांगतानाच हा उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पक्ष प्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग लवकरच पहायला मिळण्याचे संकेतही देऊन टाकले.
२२ जून २०२२ रोजी आम्ही उठाव केला, तेव्हा माझ्यासोबत ४० आमदार होते. आता चौकार नव्हे तर षटकार मारला. २०२२ मध्ये, शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. आता शिवसेना वाढवण्यासाठी उठावाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, असे सूचक विधान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नजीकच्या काळात ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग पहायला मिळणार असल्याचे संकेतच देऊन टाकले.
अनेकांनी या सहा खासदारांवर आरोप केले. ते पक्ष सोडून जाणार असल्याचे कळताच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण ते स्वार्थासाठी शिवसेनेत आलेले नाहीत. त्यांच्या मतदारसंघातील कामे, प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी आणि शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी असेन. शिवसेना हा शब्दाला जागणारा पक्ष आहे, असेही शिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!