Maha-TET: शिक्षक पात्रता परीक्षेत हिजाब, बुरखा, नकाब वापरण्यास बंदी; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय


पुणेः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या २८ जून रोजी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (Maha-TET)  महिला उमेदवारांना हिजाब, बुरखा, दुपट्टा, नकाब वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २६ जून २०२४ रोजी दिलेल्या निकालाचा हवाला देत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. राज्यभरातून जवळपास ६ लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

२८ जून रोजी होत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या परीक्षा केंद्रावरील सर्व वर्ग खोल्यांमध्ये लाईव्ह सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार असल्यामुळे परीक्षार्थ्यांचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे. त्यामुळे वर्ग खोल्यांमध्ये मानेच्या वरच्या भागावर म्हणजेच डोके, कान, तोंड किंवा चेहऱ्यावर दुपट्टा, बुरखा, नकाब, हिजाब, मास्क, टोपी यापैकी कोणत्याही प्रकारचे कपडे अथवा आवरण ठेवता येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

भारतातील यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, एसबीआय, आरआरबी, गेट, क्लॅट, सीए, सीएस, सीएमए अशा  राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा आणि एमपीएससी, जीपीएससी, बीपीएससी, यूपीपीएससी यासारख्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये दुपट्टा, बुरखा, स्कार्फ, टोपी, गॉगल्स अशळा चेहरा झाकणारे कपडे आणि उपकरणांना प्रतिबंधक करण्यात आला आहे. ओळख पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि संपूर्ण परीक्षा कालावधीत सीसीटीव्ही पडताळणी प्रक्रियेमध्ये चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असते. परीक्षेमध्ये चेहऱ्यावरील हिजाब, बुरखा किंवा दुपट्टा यावर बंदी घालण्यामागचा मुख्य उद्देश लाईव्ह सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परीक्षा कालावधीत सर्व उमेदवारांवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणे, ओळख पडताळणी सुलभ करणे व पर्यायाने परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम ठेवणे हा असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने म्हटले आहे.

‘शिक्षक पात्रता परीक्षा ही अतिशय संवेदनशील परीक्षा असून एआय, ब्लूटूथ डिव्हाईस, शर्टच्या बटनाएवढ्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर इत्याही बाबी लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ न देणे हे अतिशय आव्हानात्मक झालेले आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी व सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालता यावा यासाठी सर्वच ६ लाख उमेदवारांचे चेहरे लाईव्ह सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसणे गरजेचे आहे.’ -डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद.

परीक्षेतील गैरप्रकारासाठी आजकाल मोबाईल बाळगणे, मोबाईलद्वारे प्रश्नप्रत्रिका व्हॉट्सअप, टेलिग्रामद्वारे बाहेर पाठवणे, मोबाईलद्वारे उत्तरे प्राप्त करून घेणे, कानामध्ये अतिशय लहान आकाराचे वायफाय ब्लूटूथ ठेवणे या व अशा अनेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच उमेदवारांचा संपूर्ण चेहरा, मानेच्या वरील संपूर्ण भाग म्हणजेच तोंड, कान हे अवयवय स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे गैरप्रकाराबाबत संशय घेण्यास वाव राहणार नाही. तोंड झाकून ठेवल्यास कोण एकमेकांशी बोलत आहे, हे देखील कळणार नाही. परीक्षा केंद्रामध्ये संशयावरून पडताळणीसाठी एखाद्या महिला उमेदवारास चेहरा दाखवण्यास सांगितले तर कदाचित त्यामधून वेगळाच प्रश्न उद्भवू शकतो, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या डीएलएड व संगणक लघुलेखन परीक्षेमध्ये उमेदवारांनी दुपट्टा/बुरख्यामध्ये लपवून मोबाईल परीक्षा केंद्रामध्ये आणल्याचे व त्याचा वापर केल्याच निष्पन्न झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब व दुपट्टा वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे ईमेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा हवाला देत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या विनंत्या फेटाळून लावल्या आहेत.

…पण कोणतेही कपडे वापरण्याची मुभा

शिक्षक पात्रता परीक्षेत महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर वर्ग खोल्यांमध्ये चेहरा मात्र पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसला पाहिजे, यासाठी मानेच्या वर, म्हणजेच कान, डोके, तोंड किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कपडा किंवा आवरण असता कामा नये, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!