मोठी बातमीः राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम, पण खा. सुप्रिया सुळेंकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद?


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा देऊन तीन दिवस उलटल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शरद पवारांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असून शरद पवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायमस्वरुपी रहावे, असा एक ओळीचा ठराव या बैठकीत केला जाईल आणि पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच नवीन फळी तयार व्हावी म्हणून खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद सोपवण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्रीशीर सूत्रांनी न्यूजटाऊनला दिली.

 ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथनाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यातच शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम रहावे म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला. काही कार्यकर्ते तर गेल्या तीन दिवसांपासून यशवतंराव चव्हाण सेंटरसमोर आंदोलनाला बसलेले आहेत.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करतानाच शरद पवारांनी नव्या अध्यक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी एक समितीही घोषित केली होती. या समितीची बैठक आज मुंबईत होत आहे. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, नरहरी झिरवळ, फौजिया खान इत्यादी नेते हजर झाले आहेत.

 कार्यकर्त्यांची तीव्र भावना आणि पक्षाला एकसंध ठेवण्याची गरज लक्षात घेता शरद पवार त्यांची राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी संपेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहतील. पुढील तीन वर्षे शरद पवार हे राज्यसभा सदस्य राहणार आहेत. या बैठकीत नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करायची याबाबत जास्तीचा खल न करता एका ओळीत शरद पवार यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्यंत खात्रीशीर सूत्रांनी दिली.

पवारांच्या मार्गदर्शनाखाली नव्या नेतृत्वाचे ट्रेनिंग

शरद पवार हेही कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेता तीन वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्यास तयार होतील, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? या प्रश्नाचे उत्तरही याच बैठकीत मिळणार आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादी काँग्रेससाठी भक्कम आणि तयार नेतृत्व तयार झाले पाहिजे. नव्या नेतृत्वाची फळी उभी राहिली पाहिजे, यासाठी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद सोपवण्याचा निर्णयही याच बैठकीत होईल असेही या सूत्रांनी सांगितले.

पवारांशिवाय कोणताच पर्याय नाही!

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समिती नेमल्यानंतर या समितीने अनेक पर्यायांची चाचपणी करून पाहिली. परंतु या समितीला अध्यक्षपदासाठी शरद पवारांशिवाय अन्य कोणताच पर्याय दिसला नाही. या समितीचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या बैठकीला जाण्यापूर्वीच हे स्पष्ट केले. अध्यक्षपदासंदर्भात समिती नेमली आहे. या समितीने अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला. बरेच पर्याय समोर आले. पर्यायांचा बराच विचार केला. महाराष्ट्रात असो की देशातील सर्व नेत्यांना वाटते की शरद पवारच अध्यक्ष असावेत. आम्हीच बरेच पर्याय पाहिले पण आमच्यासमोर पवारांशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही. त्यामुळे शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असावेत, असे भुजबळ म्हणाले.

…तर पवारांच्या घरासमोर उपोषणाला बसू

पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांचा राजीनामा मानायला तयार नाहीत. आम्हीही मानायला तयार नाही. शरद पवार हेच अध्यक्ष असावेत. शरद पवार हेच कायमस्वरुपी अध्यक्ष असावेत, असा ठराव आम्ही करणार आहोत. शरद पवार यांनाही अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह धरणार आहोत. पण पवारांनी आमचे ऐकले नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषण करू, असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!