राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला, आता चेंडू पवारांच्याच कोर्टात!


मुंबईः  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा फेटाळून लावण्याचा ठराव मांडला. या ठरावाला या कमिटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. कोअर कमिटीने राजीनामा फेटाळून लावल्यानंतर आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

शरद पवारांचा राजीनामा आम्ही एकमताने नामंजूर केला आहे. शरद पवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायमस्वरुपी रहावे, अशी सर्वांची भावना आहे. आम्ही मंजूर केलेल्या प्रस्तावानंतर शरद पवारांना भेटू आणि त्यांच्याशी चर्चा करू, असे पटेल म्हणाले.

हेही वाचाः मोठी बातमीः राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम, खा. सुप्रिया सुळेंकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद?

तीन दिवसांपूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नवा अध्यक्ष निवडीसाठी स्थापन केलेल्या कोअर कमिटीची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि यावर आज बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला, असे पटेल म्हणाले. शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. त्यांनीच कायमस्वरुपी अध्यक्षपदी रहावे, अशी विनंती आम्ही त्यांना करतो, असे या ठरावात म्हटले आहे.

शरद पवार आपला निर्णय कार्यक्रमात जाहीर करतील, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वांनी आपली भावना व्यक्त केली. त्यानंतरही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांना आम्ही तेव्हापासून विनंती करत राहिलो. देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे, अशी विनंती शरद पवारांना केली.

 राजीनामा फेटाळण्याच्या कोअर कमिटीच्या या निर्णयामुळे आता पुढचा चेंडू शरद पवार यांच्याच कोर्टात गेला आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता शरद पवारांच्याच निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील निर्णयाची दिशा ठरणार आहे.

कोण होते बैठकीत?

कोअर कमिटीच्या या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन  मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, एकनाथ खडसे, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहन हे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!