वसंतराव नाईक महाविद्यालयाला दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांकांची ऍलर्जी; विद्यापीठ नामविस्तार दिन, रमजान ईदसह ११ सार्वजनिक सुट्ट्यांना मनमानीपणे कात्री!


छत्रपती संभाजीनगरः विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आपले खरे दात दाखवत सुरूवात केली असून स्वायत्ततेच्या नावाखाली मनमानी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन, बुद्ध पोर्णिमा, रमजान ईद, बकरी ईदसह तब्बल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या तब्बल ११ सार्वजनिक सुट्यांना कात्री लावली आहे. विशेष म्हणजे कमी करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या दलित, मुस्लिमांसह केवळ अल्पसंख्याक समाजाशीच संबंधित आहेत.

नितीन राठोड सचिव असलेल्या वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वंसतराव नाईक महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित आहे. या महाविद्यालयाला ३ मार्च २०२६ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी)  ‘स्वायत्त दर्जा’ बहाल करण्यात आला आहे. महाविद्यालयाची ही स्वायत्तता केवळ शैक्षणिक बाबींपुरतीच मर्यादित असून हे महाविद्यालय आर्थिकदृष्ट्या वेतन अनुदानासाठी राज्य सरकारवरच विसंबून आहे. तरीही स्वायत्त दर्जा मिळाल्यापासून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य डॉ. संजीव एम. रेड्डी आणि संस्थेचे सचिव नितीन राठोड यांनी मनमानीपणे कारभार करायला सुरूवात केली आहे.

हेही वाचाः ‘स्वायत्त दर्जा’ मिळताच संस्थाचालकांच्या अंगात मस्तीः वसंतराव नाईक महाविद्यालयातील तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीची ‘घाऊक’ कारवाई!

याआधी संस्थेचे सचिव नितीन राठोड आणि प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जाहीर केलेली शैक्षणिक दिनदर्शिका पायदळी तुडवत उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीतही महाविद्यालयातील प्राध्यापकांना महाविद्यालयातच कामाला जुंपून ठेवले. स्वतःच ठरवलेल्या वेळापत्रकात अचानकपणे बदल करत उन्हाळी सुट्ट्यांत वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी गेलेल्या प्राध्यापकांना महाविद्यालयात हजर राहण्याचे फर्मान सोडून केवळ ‘शैक्षणिक दिनदर्शिके’चे पालन करण्याची मागणी करणारे निवेदन देणाऱ्या प्राध्यापकांना बडतर्फीच्या नोटिसा बजावून त्यांची विभागीय चौकशी लावली.

हेही वाचाः वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची निवड प्रक्रियाच बोगस, प्रचलित नियम धाब्यावर बसवून ‘अपात्र’ डॉ. संजीव रेड्डींची ‘मागच्या दारा’ने नियुक्ती!

वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या मनमानीवरून सुरू झालेल्या या वादावर अद्याप पडदा पडलेला नसतानाच आता महाविद्यालय व्यवस्थापनाने मनमानी करत राज्य सरकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांपैकी तब्बल ११ सार्वजनिक सुट्ट्या कमी केल्या आहेत. विशेष म्हणजे कपात करण्यात आलेल्या सर्व सार्वजनिक सुट्ट्या दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी अशा अल्पसंख्यांक समुदायाशीच संबंधित आहेत. या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये मनमानीपणे कपात करून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आपला अल्पसंख्यांकविरोधी खरा चेहराच दाखवून दिला आहे.

हेही वाचाः Maha-TET: शिक्षक पात्रता परीक्षेत हिजाब, बुरखा, नकाब वापरण्यास बंदी; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव एम. रेड्डी यांनी २२ जून रोजी एक सूचना जारी करून २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. १४ जून रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत या सार्वजनिक सुट्ट्या मंजूर करण्यात आल्याचे डॉ. रेड्डी यांनी जारी केलेल्या या सूचनेत म्हटले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्यांमध्ये महाराष्ट्र सरकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांपैकी तब्बल ११ सार्वजनिक सुट्ट्यांना कात्री लावण्यात आली आहे.

कपात करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन (१४ जानेवारी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन (२३ ऑगस्ट), रमजान ईद (२१ मार्च), महावीर जन्म कल्याणक (३१ मार्च), गुड फ्राय डे (३ एप्रिल), बुद्ध पोर्णिमा (१ मे), बकरी ईद (२८ मे), मोहोर्रम ताजिया (२६ जून), पारसी नववर्ष (१५ ऑगस्ट), ईद-ए-मिलाद (२६ ऑगस्ट) आणि गुरू नानक जयंती (२४ नोव्हेंबर) या सार्वजनिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

नोटीस जारी करून केली मोहर्रम सुट्टी रद्द

विशेष म्हणजे वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव एम. रेड्डी मोहर्रम ताजियाची सार्वजनिक सुट्टी रद्द केल्याची सूचना महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. २६ जून रोजी महाविद्यालय सुरू राहील आणि नियमित कामकाज होईल. मोहर्रमच्या दिवशी महाविद्यालयाला सुट्टी असणार नाही आणि नेहमीप्रमाणे सर्व शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज सुरू राहील. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी आणि महाविद्यालयात उपस्थित रहावे, असे या नोटिशीत म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांनी ठोठावले थेट यूजीसीचे दार!

वसंतराव नाईक महाविद्यालय व्यवस्थापनाच्या या मनमानीवर आक्षेप घेत महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थेट विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव, यूजीसीच्या स्वायत्तता ब्युरोचे सहसचिव, विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू आणि राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांकडे तक्रार केली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी २२ जून रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक सूचना जारी करून २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ११ सार्वजनिक सुट्ट्या वगळण्यात आल्या आङेत. त्याला आमचा तीव्र आक्षेप असून या सार्वजनिक सुट्ट्यांच्या कपतीबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि नियामक मंडळाला निर्देश द्यावेत, असे या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवर महाविद्यालयातील ३९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!