पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे निंबाळकरांचे ‘वेट अँड वॉच’, शिंदे सेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात?; बंडखोरांची धडधड वाढली!


मुंबईः काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्याचे माजी गृह राज्यमंत्री डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व ९ आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आणि पवनराजेंचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा माझा अंतिम निर्णय झालेला नाही, मतदारसंघात जाऊन सर्वांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेईन, अशी भूमिका मांडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून घोंगावू लागलेले ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  परिणामी बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या (उबाठा) अन्य पाच खासदारांची धडधड वाढली आहे.

२० वर्षांपूर्वी घडलेल्या काँग्रेस नेते पवन राजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्याप्रकरणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तसेच माजी गृह राज्यमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ९ आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर कलियुग आहे. कलियुगात वाईटाला अधिक बळ मिळते आणि चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

हेही वाचाः ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांपैकी हिंगोलीचे आष्टीकर ठरले रात्रीच्या अंधारात दिल्लीत पोहोचणारे पहिले खासदार, वाचा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नेमके काय घडले?

विशेष म्हणजे या निकालाच्या दोन दिवस आधीच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यात ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांना फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात आल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ऑपरेशन टायगर राबवताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. विशेष जेट विमानाने १६ जूनच्या मध्यरात्री हे बंडखोर खासदार नवी दिल्लीत दाखल झाले.

या बंडखोर खासदारांनी नवी दिल्ली गाठत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतःच्या स्वाक्षरीने त्यांना पत्र दिले. या पत्रात या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत विलीन होण्याचा औपचारिक प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे सहाही खासदार लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज जाहीर झालेल्या ओमराजे निंबाळकर हत्याप्रकरणाच्या निकालाने मात्र ‘ऑपरेशन टायगर’मध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘माझा अंतिम निर्णय झालेला नाही. मी मतदारसंघात जाऊन सर्वांशी चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल. मला मतदारसंघातील लोकांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. या खटल्याचा आणि माझ्या निर्णयाचा काहीही संबंध नव्हता. माझी राजकीय कारकीर्द हा भाग माझ्या मतदारसंघाशी जोडलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी, लोकांशी चर्चा करूनच निर्णय घेईन.खा. ओमराजे निंबाळकर, धाराशिव.

या निकालानंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना खुद्द ओमराजे निंबाळकर यांनीच या मोठ्या ‘ट्विस्ट’चे स्पष्ट संकेत दिले आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला, आता पक्षांतराचा निर्णय बदलणार का? असा प्रश्न ओमराजे निंबाळकरांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, माझा अंतिम निर्णय झालेला नाही. मी मतदारसंघात जाऊन सर्वांशी चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल. मला मतदारसंघातील लोकांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. या खटल्याचा आणि माझ्या निर्णयाचा काहीही संबंध नव्हता. माझी राजकीय कारकीर्द हा भाग माझ्या मतदारसंघाशी जोडलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी, लोकांशी चर्चा करूनच निर्णय घेईन, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

ओमराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेतून (उबाठा) फुटून गेलेल्या अन्य पाच खासदारांची धडधड वाढली आहे. शिवसेनेच्या या बंडखोर खासदारांमध्ये ओमराजे यांच्या व्यतिरिक्त हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी शिवसेनेने (उबाठा) व्हीप बजावून १८ जून रोजी बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे या ठाकरे गटातील फुटीवर शिक्कामोर्तब झाले होते.

लोकसभेत शिवसेनेच ९ खासदार होते. यापैकी ६ म्हणजेच दोन तृतीयांश खासदांनी ठाकरे सेनेची साथ सोडली. या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा औपचारिक प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांना दिला आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार होणारी अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर ठाकरे गटाच्या ९ पैकी किमान ६ म्हणजेच दोन तृतीयांश खासदारांना ठाकरे गटातून एकत्रितपणे बाहेर पडावे लागेल. पण आता पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाच्या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षांतराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ‘ऑपरेश टायगर’ फसण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे.

या फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही सक्रीय झाली असून त्यांनी फूट टाळण्यासाठी जोरदार फिल्डिंगही लावली आहे. पवनराजे हत्या प्रकरणी न्यायालयाचा निकाल येताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया आली आहे. ओमराजे निंबाळकरांचा विश्वासघात झाला आहे. ते परत येणार असतील, तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलावे, असे सांगत देसाई यांनी ओमराजेंच्या परतीचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेतच देऊन टाकले आहेत. ओमराजे निंबाळकर बंडखोरीचा निर्णय मागे घेऊन माघारी फिरल्यास अन्य पाच बंडखोर खासदार पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात आणि त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळे त्यांची धडधड वाढली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!