
मुंबईः धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या बहुचर्चित हत्याप्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची आज विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जून २००६ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली येथे या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तब्बल २० वर्षांनंतर आज विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. या निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावरच अलबंवून असताना त्याच्या जबाबाच्या बाबतीतच संदिग्धता आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष फिरवल्याने त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला फितूर घोषित करण्यात आले आणि संशयाचा फायदा देऊन या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी पद्मसिंह पाटील रूग्णवाहिकेतून व्हिलचेअरवर न्यायालयात दाखल झाले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चेत आलेले पवनराजेंचे खासदार पुत्र ओमराजे निंबाळकरही न्यायालयात आले होते.
विशेष सीबीआय न्यायाधीश आर.एस. नावंदर यांनी या प्रकरणातील सीबीआयचा तपास, त्यातील त्रुटी, माफीचा साक्षीदार आणि पवनराजेंच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांच्या साक्षीवरच निकालपत्रात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराने तीनवेळा घटनाक्रम बदलला. त्यामुळे त्याने सांगितलेला घटनाक्रम विश्वासार्ह मानता येणार नाही, असे न्या. नावंदर यांनी निकालपत्रात म्हटले आहे. पवनराजेंच्या पत्नी आनंदीदेवी यांनी दिलेली साक्षही न्यायालयाने अमान्य केली. सीबीआयने आरोपींचे कॉल रेकॉर्डसारख्या पुरावा गोळा केला नाही. त्यामुळे गुन्हा त्यांनीच केला हे सिद्ध होत नाही, असे सांगत न्यायालयाने संशयाचा फायदा देत या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
२००२ पासून पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या राजकीय दरी निर्माण झाली होती. पवनराजेंनी २००३ मध्ये आपल्या जिवाला धोका असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. आम्ही १२७ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदारावर अलंबून आहे. जैन यांना १५ दिवस मारहाण करून जबाब घेतला, त्याची औषधे बंद केली, हे अयोग्य आहे. ८ सप्टेंबरला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने जैन यांना २५ सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. पोलिसांच्या तपासात विसंगती आहे, असे न्या. नावंदर यांनी या निकालपत्रात म्हटले आहे.
पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. पवनराजेंची हत्या केल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्यांचे चालक समद काझी यांचीही गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात पवनराजे आणि समद काझी या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पद्मसिंह पाटील हे खासदार असताना ६ जून २००९ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.
राजकीय कारकिर्द आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यामुळे पद्मसिंह पाटील व इतरांनी मिळून पवनराजेंच्या हत्येचा कट रचला. अनेक महिने या हत्येचा कट रचण्यात येत होता. त्यानंतर या कटाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी २५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असा सीबीआयचा आरोप होता.
या प्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध खटला चालवण्यात आला. अन्य आरोपींमध्ये लातूरचे व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त निरीक्षक मोहन शुक्ला आणि गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा समावेश आहे. चौदा वर्षांपूर्वी म्हणजेच ४ जुलै २०११ रोजी विशेष न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सुनावणीदरम्यान पद्मसिंह पाटील यांच्या वतीने साडेबाराशे पानांचे लेखी म्हणणे सादर करण्यात आले होते.
सीबीआयच्या तपासानुसार पारसमल जैन याने सुरूवातीला शुक्ला व मंदाडे यांच्याकडून पवनराजे यांच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी स्वीकारली होती. मात्र नंतर पारसमल जैन माफीचा साक्षीदार बनला. त्याने इतर आरोपींविरोधात न्यायालयात साक्ष दिली.
या प्रकरणाचा तपास सुरूवातीला नवी मुंबई पोलिसांनी केला. मात्र तपासाच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करत पवनराजेंच्या पत्नी आनंदीदेवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर जून २००९ मध्ये पद्मसिंह पाटलांना अटक झाली होती.
जुलै २०११ मध्ये सुनावणी सुरू झाल्यानंतर तब्बल १५ वर्षे चाललेल्या या खटल्याचा विषय वेगवेगळ्या कारणांनी सर्वोच्च न्यायालयातही गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने खटला लवकर संपवण्याचे निर्देश दिले होते.
निकाल दुर्दैवी, हायकोर्टात दाद मागूः ओमराजे
विशेष सीबीआय न्यायालयाचा हा निकाल दुर्दैवी असल्याचे पवनराजेंचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी या खटल्याच्या निकालानंतर म्हटले आहे. या खटल्यातील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून २० वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत होतो. न्यायालयाच्या निकालावर मी प्रतिक्रिया देणार नाही. यापुढे आम्ही उच्च न्यायालयात या संबंधी दाद मागू. तेथे आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
