राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन स्व-नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू; कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर तपशील


मुंबई: केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी स्व-नामांकन प्रक्रिया १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.

पात्र शिक्षकांनी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर १० जुलै २०२६ पर्यंत स्व-नामांकन नोंदवावे. तसेच अर्जदारांनी आपले स्व-नामांकन अंतिम करून १३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

राज्यातील अधिकाधिक पात्र शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी अर्ज करून आपल्या शैक्षणिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्याची संधी साधावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

पुरस्काराचे उद्दिष्ट काय?

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिवशी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी निष्ठेने आणि समर्पितपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

कोण करू शकतो अर्ज?

राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक निकाय आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश मंडळाशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक/उच्च/उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शाळा शिक्षक आणि मुख्याध्यापक पुरस्कारासाठी पात्र आहेत.

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा (केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, संरक्षण मंत्रालय संचालित सैनिक शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्था आणि आदिवासी कल्याण मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा यासह)केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा परिषदेशी (सीआयएससीई) संलग्न शाळा.

अधिक माहितीसाठी संपर्क

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांबद्दल अधिक माहितीसाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या: https://nationalawardstoteachers.education.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!