भाजप उमेदवार नवनीत राणा यांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्लीः अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि याच मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोठा दिलासा मिळाला आहे. राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनावट ठरवून ते रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवण्यात आला असून राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचे म्हटले आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सर्व बाबी तपासून नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवण्याचा योग्य निर्णय दिला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करून आपल्या विशेषाधिकारात ते जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याचा दिलेला निर्णय चुकीचा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटले आहे.

अमरावतीच्या खासदार नवीन राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनावट आहे आणि ते गैरपद्धतीने मिळवले आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजी दिला होता. बेकायदा कृत्य केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांची खासदारकीच रद्द होण्याची वेळ आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने नवनीत राणा यांची खासदारकी वाचली होती. त्यानंतर सुमारे अडीच वर्षांनी आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्णय दिला आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. आडसूळ यांनी राणा यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बनावट जातप्रमाणपत्राआधारे राणा यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मोची या जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा आरोप आडसूळ यांनी केला होता. ८ जून २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जातीचे प्रमाणपत्र बनावट ठरवून रद्द केले होते. आता तेच जातप्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!