मुंबईः बँकेच्या सेव्हिंग अकाऊंट म्हणजेच बचत खात्यात पैसे ठेवण्याची कोणतीही मर्यादा नसते. म्हणजेच खातेदार त्याच्या बचत खात्यात हवे तेवढे पैसे जमा करू शकतो, पण बचत खात्यात जमा रक्कम इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत असेल आणि त्या रकमेच्या स्रोताची माहिती तुम्ही दिली नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
देशातील ८० टक्क्यांहून अधिक लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहेत. बँकांवरील लोकांचा विश्वास वाढल्यामुळे लोकांनी बँकेत पैसे ठेवण्यास सुरूवात केली आहे. बँकेत फक्त पैसा सुरक्षितच रहात नाही तर व्याजही मिळते. अनेक लोक आपल्या आयुष्यभराची कमाई आपल्या बचत खात्यात ठेवतात. परंतु बचत खात्यात आपण किती पैसे ठेवू शकतो आणि बचत खात्यातील किती रक्कम इन्मक टॅक्सच्या कक्षेत येते, हे अनेकांना माहीतच नसते.
बचत खात्यात एका आर्थिक वर्षात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर इन्कम टॅक्स विभागाला त्याबाबतची माहिती देणे आवश्यक असते. इन्मक टॅक्स विभागाला तुमच्या स्रोताची माहिती दिली आणि तुमच्या उत्तराने इन्कम टॅक्स विभाग समाधानी झाला नाही तर तो तपास करू शकतो आणि तपासादरम्यान तुम्ही पकडले गेल्यास तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो.
स्रोतांची समाधानकाकर माहिती दिल्याशिवाय तुम्ही जर एका आर्थिक वर्षात बचत खात्यात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केलेली असेल तर इन्मक टॅक्स जमा केलेल्या रकमेवर ६० टक्के कर, २५ टक्के अधिभार आणि ४ टक्के उपकर लावून दंड आकारू शकतो.
बचत खात्यातील रकमेबाबत एका आर्थिक वर्षात जशी १० लाखांची मर्यादा आहे, तीच मर्यादा एफडीमधील रोख ठेवी, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, बॉण्ड्स आणि शेअर्सवरही लागू होते. या रकमेच्या स्रोतांची माहिती तुम्हाला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सीबीडीटीला द्यावी लागते.