बालभारतीने केले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे कर्तृत्व संकुचित, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात ‘ऐतिहासिक घोडचूक’;  देशातील मुलींची पहिली शाळा…


पुणेः महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून देशातील स्त्री शिक्षणाची क्रांतीकारी बिजे रोवली. वस्तुनिष्ठ ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित असलेला हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे, परंतु बालभारतीलाच हा इतिहास मान्य नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या उत्तुंग कर्तृत्वाला संकुचित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. बालभारतीच्या या कोतेपणावर शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून ही ‘ऐतिहासिक घोडचुक’ तातडीने दुरूस्त करण्याची मागणी केली आहे.

महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू करून भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ऐतिहासिक पुराव्यांआधारे ‘देशातील पहिली मुलींची शाळा’ अशी या शाळेची ऐतिहासिक नोंद आहे. परंतु बालभारतीच्या २०२६-२७ या चालू शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात मात्र या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा संकुचित करण्यात आला आहे. बालभारतीने केलेल्या या ऐतिहासिक घोडचुकीवर प्रहार शिक्षक संघटनेने तीव्र आक्षेप घेतला असून संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी बालभारतीच्या संचालिका डॉ. अनुराधा ओक यांना निवेदन पाठवून ही चूक तातडीने दुरूस्त करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत दस्तऐवज, राष्ट्रीय स्मारकांमधील नोंदी आणि विविध प्रामाणिक संदर्भ ग्रंथांमध्ये महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या शाळेंची नोंद ‘देशातील पहिली मुलींची शाळा’ अशीच आहे. मात्र बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग २’ या पाठ्यपुस्तकात मात्र या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा मर्यादित करण्यात आला आहे, असे प्रहार शिक्षक संघटनेने बालभारतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या मर्यादित उल्लेखामुळे ऐतिहासिक सत्याचा संकोच होत असून विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचत आहे. बालभारतीसारख्या अग्रगण्य संस्थेकडून राष्ट्रपुरूषांच्या महान कार्याबाबत अशी चूक होणे अत्यंत खेदजनक आहे. यामुळे भावी पिढीमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या चुकीमुळे राज्यातील शैक्षणिक वर्तुळात आणि समाजमनात तीव्र असंतोष पसरला आहे, असेही प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी बालभारतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकातील ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ हा चुकीचा, संकुचित आणि मर्यादित उल्लेख तातडीने बदलून तेथे ‘देशातील (भारतातील) पहिली मुलींची शाळा’ अशी दुरूस्ती तातडीने करण्यात यावी, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून या दुरूस्तीबाबत बालभारतीने तातडीने अधिकृत शुद्धीपत्र जारी करावे, अशी मागणी ठाकरे यांनी बालभारतीला दिलेल्या निवेदनात केली आहे.

भविष्यात पाठ्यपुस्तक निर्मिती करताना अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधित समितीला अधिक सतर्क राहण्याच्या कडक सूचना द्याव्यात, अशा मागण्या “ठाकरे यांनी बालभारतीकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. पाठ्यपुस्तकात महापुरूषांच्या जागतिकस्तरावरील कार्याचा गौरव योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे, याची खबरदारी घेण्याचेही प्रहार शिक्षक संघटनेने बालभारतीला बजावले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!