‘डॉ. बामु’ची अधिसभा निवडणूकः विद्यापीठ विकास मंचकडे कार्यकर्तेही फिरकेनात, ऐन मतदानाच्या दिवशीच दैना!


औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा गणासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणित अभाविपने विद्यापीठ विकास मंचच्या नावाखाली उमेदवार उभे केले आहेत.  मात्र मतदारांच्या सोयीसाठी विद्यापीठ विकास मंचने मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या मंचावर बसण्यासाठीही या पॅनलला कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र आज पहायला मिळाले. ऐन मतदानाच्या दिवशीच विद्यापीठ विकास मंचची ही दैना पाहून मतदानाआधीच विद्यापीठ विकास मंचाने पराभव मान्य केलाय की काय?  अशी चर्चा मतदारांमध्ये ऐकायला मिळत होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून आज संविधान दिनीच पदवीधर गणातून निवडावयाच्या दहा अधिसभा सदस्यांच्या निवडीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या नावाखाली उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात उत्कर्ष पॅनल जय्यत तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. पदवीधर मतदारांच्या नोंदणीपासून ते प्रचारापर्यंत आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेण्यापर्यंत उत्कर्ष पॅनलची नियोजनबद्ध तयारी दिसून आली.

दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची विद्यार्थी आघाडी असलेल्या अभाविपनेही विद्यापीठ विकास मंचच्या नावाखाली या निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत. आज मतदानाच्या दिवशी उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंचने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या सोयीसाठी मंच उभारले आहेत. मात्र या मंचावर बसून मतदारांना माहिती देण्यासाठी विद्यापीठ विकास मंचला कार्यकर्तेच मिळत नसल्याचे चित्र आज पहायला मिळाले. औरंगाबादेतील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर हे चित्र पहायला मिळाले. उत्कर्ष पॅनलच्या मंचावर कार्यकर्ते आणि मतदारांचीही गर्दी असल्याचे दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार? याबाबतचे अंदाज आजच मतदारांकडून बांधले जात असल्याचेही ऐकायला मिळाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!