कन्नडिगांची दादागिरीः बेळगावात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड, शरद पवारांचा कर्नाटकला २४ तासांचा अल्टिमेट!

बेळगाव/मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उग्र स्वरुप धारण करताना दिसत आहे. बोम्मईंच्या चिथावणीमुळे कन्नडिगांनी दादागिरी करत कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवत तोडफोड केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नावर संपर्क साधला, पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. परिणामी सीमा भागात दहशतीचे वातावरण आहे. या सर्व परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संतप्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या संयमालाही मर्यादा आहेत. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात होणारे हल्ले थांबले नाहीत तर महाराष्ट्राने आतापर्यंत राखून ठेवलेल्या संयमाची जागा वेगळी गोष्ट घेऊ शकते. मग त्यानंतर जे काही होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची असेल, असा सज्जड इशारा त्यांनी कर्नाटकला दिला आहे.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला. त्यानंतर मंगळवारी कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकत्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले. महाराष्ट्राची पासिंग असलेल्या सहा ट्रक्सवर या समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केली.

कन्नड रक्षक वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलनही केले. या प्रकारानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकावर टिकास्त्र सोडले. राज्य सरकार दुर्बल असल्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. हा हल्ला म्हणजे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. मी अजूनही सांगतोय की, महाराष्ट्रातील जनतेची भूमिका ही संयमाची आहे. त्याला मर्यादा येऊ नयेत, हीच माझी इच्छा आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री चिथावणी देऊन हल्ले घडवत असतील तर हा देशाच्या ऐक्याला धोका आहे. हे काम कर्नाटकात होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे पवार म्हणाले.

उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी ही गोष्ट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घातली पाहिजे. अन्यथा उद्या महाराष्ट्रात कोणीही कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असेही शरद पवार म्हणाले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने संविधान ज्यांनी लिहिले आहे, सर्व भाषिक लोकांना समान अधिकार दिले, त्या पुण्यमहात्म्याचे स्मरण करण्याचा आहे. त्याच दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर घडलेला प्रकार निषेधार्ह आहे, असेही पवार म्हणाले.

 …तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात जावे लागेलः बेळगावमधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांच्या कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे. तेथील मराठी भाषिक या सगळ्या परिस्थितीला तोंड देत असून ते दहशतीखाली जगत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पुढील २४ तासांत परिस्थिती निवळली पाहिजे. येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपले नाही तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल. कर्नाटकच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे, असेही पवार म्हणाले.

अमित शाहांच्या कानावर टाकणार- फडणवीसः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती दिली. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, नाराजी देखील व्यक्त केली, चिंताही व्यक्त केली आणि अपेक्षाही व्यक्त केली की, तत्काळ यावर कारवाई झाली पाहिजे. तत्काळ कारवाई केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारच्या घटना करत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल,असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वस्त केले आहे, असे फडणवीस म्हणाले.

याबाबतीत सरकार कोणालाही पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी मला आश्वस्त केले आहे. आता त्यांनी जे काही सांगितले आहे, त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. याचसोबत हा संपूर्ण विषय मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे, असे फडणवीस म्हणाले. ऍक्शनला रिऍक्शन दिली तर गोष्टी वाढत जातील. या कोणाच्याही हिताच्या नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसैनिक आक्रमकः दरम्यान, कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी दुधगंगा नदीच्या पुलावरच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत झटापटही झाली.

महाराष्ट्राचे दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे आज बेळगावला जाणार होते. महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारीही केली होती. मात्र या दोन्ही मंत्र्यांनी त्यांचे दौरे अचानक रद्द केले. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या दोघांनाही प्रतिकात्मक बांगड्यांचा आहेरही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *