विद्यापीठातील गौतम बुद्ध अध्यासनालाच नाही ‘बुद्ध जयंती वर्षा’चा थांगपत्ता; आधी केला २५८६ व्या जयंतीचा दावा, आक्षेप घेताच…


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): तथागत गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावर मूलभूत संशोधन व्हावे या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या गौतम बुद्ध अध्यासन केंद्रालाच यंदाचे वर्ष हे बुद्ध जंयतीचे नेमके कितवे वर्ष आहे? याचाच थांगपत्ता नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या अध्यासन केंद्राला बुद्ध जंयतीचे वर्षच माहीत नाही, ते अध्यासन गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावर कोणते आणि कसे संशोधन- अध्ययन करत असेल? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

 बुद्ध लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रसार व या तत्वज्ञानावर संशोधन करण्यासाठी काही वर्षांपूर्वी गौतम बुद्ध अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. परंतु हेच अध्यासन केंद्र यंदाचे वर्ष हे बुद्ध जयंतीचे कितवे वर्ष आहे? या मूलभूत माहितीबाबतच अनभिज्ञ आहे.

या अध्यासन केंद्राच्या वतीने यंदाच्या बुद्ध जयंतीनिमित्त आज (२२ मे) ‘सम्यक बुद्ध आणि त्यांची परंपराः एक शोध’ या विषयावर डॉ. उत्तम अंभोरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका गौतम बुद्ध अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुनिल नरवडे आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या वतीने मुद्रित करून वितरित करण्यात आली आहे.

या निमंत्रणपत्रिकेत ‘तथागत गौतम बुद्ध यांच्या २५८६ व्या जयंतीनिमित्ताने विशेष व्याख्यान’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. वस्तुतः हे २५६८ वे बुद्ध जयंती वर्ष असताना या अध्यासन केंद्राने २५८६ वी बुद्ध जयंती असल्याचा दावा कसा काय केला? असा प्रश्न उपस्थित झाला.  

 गौतम बुद्ध अध्यासन केंद्राने काही नवीन मूलभूत संशोधन करून बुद्धाच्या जन्माबाबत काही नवीन तथ्ये समोर आणली असावीत, असे वाटल्यामुळे ही निमंत्रणपत्रिका हाती पडल्यानंतर ‘न्यूजटाऊन’ने या अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुनिल नरवडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गौतम बुद्ध अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुनिल नरवडे हे प्रतिसाद देत नसल्यामुळे न्यूजटाऊनने याबाबत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यांनी डॉ. नरवडे यांच्याकडे विचारणा केली असता ‘आम्ही गुगलवर पाहिले, गुगलवर २५८६ वी जयंतीच आहे. तुमचा आक्षेप असल्यास काढून टाकतो,’ डॉ. नरवडे यांच्याकडून सांगण्यात आले.

गौतम बुद्ध अध्यासन केंद्राचे कामकाज गुगलवर चालते की ऐतिहासिक संदर्भग्रंथ, पुराव्यांवर?  असा प्रश्न न्यूजटाऊनने उपस्थित केला. त्याचे उत्तर डॉ. नरवडे यांच्याकडे नव्हते. ही घोडचूक लक्षात आणून दिल्यानंतर रात्री कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत बदल करण्यात आला आणि बदल केलेल्या पत्रिकेतून बुद्ध जयंतीचे वर्षच काढून टाकण्यात आले. पण या निमंत्रणपत्रिका कोणाला वितरित केल्या? हे मात्र कळू शकले नाही. नंतर न्यूजटाऊनने डॉ. नरवडे यांच्याशी संपर्क साधला असता ‘आम्ही बुद्ध जयंती वर्ष वगळले’ असे सांगण्यात आले. आज सकाळी या निमंत्रपत्रिकेत पुन्हा बदल करून २५६८ वी जयंती असा उल्लेख करण्यात आला. एखाद्या अध्यासन केंद्राची ही कृतीच त्या अध्यासनात नेमके कोणते आणि कसे अध्ययन चालते? यावर लख्ख प्रकाश टाकणारी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे जग प्रसिद्ध बुद्ध लेणींच्या पार्श्वभूमीवर वसलेले असल्यामुळे या विद्यापीठाला बौद्ध तत्वज्ञान आणि कलेचा मोठा वारसा लाभला आहे. या वारश्याशी आपले नाते व्यक्त करण्यासाठी विद्यापीठाने गौतम बुद्ध अध्यासन केंद्र स्थापन केले आहे, असे या अध्यासन केंद्राच्या स्थापनेबाबत सांगणारे विद्यापीठ चुकीची माहिती प्रस्तृत करून कोणता वारसा सांगत आहे  आणि नेमक्या कोणत्या बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार करत आहे? हे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गौतम बुद्ध अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानाच्या निमंत्रणपत्रिकेत यंदाचे वर्ष हे २५८६ वे बुद्ध जयंती वर्ष असल्याचा दावा करण्यात आला. त्यावर आक्षेप घेताच जयंती वर्ष वगळून टाकण्यात आले.

हा कार्यक्रम म्हणजे केवळ उपचार!

विशेष म्हणजे ज्या गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा जगाने अंगीकार केला, त्या ‘लाइट ऑफ एशिया’ बुद्धाच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ना कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची उपस्थिती आहे, ना प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांची उपस्थिती आहे. हा कार्यक्रमही एका विभागात म्हणजेच अर्थशास्त्र विभागात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अन्य महापुरूषांच्या नावे असलेल्या अध्यासन केंद्राचे कार्यक्रम मात्र मुख्य सभागृहात आयोजित केले जातात आणि त्या कार्यक्रमांना कुलगुरू, प्र-कुलगुरू उपस्थितही असतात. मग बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाबाबत दुजाभाव का? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

कसे मोजले जाते बुद्ध जयंती वर्ष?

भंते ज्ञानरक्षित यांनी बुद्ध जयंती वर्ष मोजण्याची अगदी सोपी पद्धत सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात पहिल्यांदा १९५६ मध्ये २५०० वी बुद्ध जयंती साजरी केली होती. तेव्हापासून भारतात बुद्ध जयंती साजरी केली जाते. चालू वर्षातून १९५६ हे वर्ष वजा करून जी संख्या येईल, ती २५०० च्या संख्येत बेरीज केल्यास चालू वर्ष हे कितवे बुद्ध जयंती वर्ष आहे, हे सहजपणे काढता येते. यंदाचे वर्ष २०२४ आहे. त्यामुळे २०२४-१९५६= ६८ ही संख्या २५०० मध्ये मिळवल्यास २५६८ येते. म्हणजेच यंदाचे वर्ष हे २५६८ बुद्ध जयंती वर्ष आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!