‘प्लॅगारिझम’ शोधणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानालाही पीएच.डी.च्या संशोधक छात्रांचा चकवा, ‘अशी’ शक्कल लढवून होत आहे सर्रास दिशाभूल!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  देशभरातील विद्यापीठांत पीएच.डी.साठी होत असलेले संशोधन आणि प्रसिद्ध केले जाणारे रिसर्च पेपर्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाङ्मय चोरी होत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पडू लागल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वाङ्मय चोरीला आळा घालण्यासाठी कठोर नियम केला खरा, परंतु पीएच.डी.च्या बहाद्दर संशोधक छात्रांनी वाङ्मयचौर्याचा शोध घेणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानालाही ‘चकवा’ देणारी शक्कल लढवण्यास सुरूवात केली असून त्यांच्या या शक्कलपुढे प्लॅगारिझम म्हणजेच वाङ्मयचौर्य शोधणारे प्रगत तंत्रज्ञानही हतबल झाले आहे. त्यामुळे या संशोधक छात्रांच्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधात वाङ्मय चोरी नसल्याचे प्रमाणीकरण करण्याशिवाय या तंत्रज्ञानापुढे अन्य पर्यायच उरला नसल्याचे न्यूजटाऊनच्या संशोधनात समोर आले आहे.

 देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये सादर होणारे पीएच.डी.चे शोधप्रबंध आणि रिसर्च पेपर्समध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाङ्मय चोरीला पायबंद घालण्यासाठी ‘विदयापीठ अनुदान आयोग (उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यामूलक सत्यनिष्ठा आणि साहित्यिक चोरीच्या प्रतिबंधाला प्रोत्साहन) नियम २०१८’ लागू केला.

हेही वाचाः पीएच.डी.च्या शोधप्रबंधात तब्बल ९४ टक्के वाङ्मयचौर्य, तरीही प्रदान झाली सर्वोच्च पदवी! वाचा महाभाग ‘विद्यावाचस्पती’चा प्रताप!

यानियमातील तरतुदींनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये पीएच.डी.चे शोधप्रबंध, लघुप्रबंध, प्रकाशने किंवा अन्य असे अन्य अनुषांगिक दस्तऐवज जमा करण्याआधीच वाङ्मय चोरीमुक्त आहेत, हे सुनिश्चित करण्यासाठी सुयोग्य सॉफ्टवेअरचा वापर करून तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणाविकसित करण्यात आली आहे.

त्यानुसार पीएच.डी.च्या संशोधक छात्रांना त्यांचा शोधप्रबंध जमा करण्याआधी वाङ्मयचौर्याच्या पडताळणीसाठी त्यांच्या शोधप्रबंधाची सॉफ्ट कॉपी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञान आधारित यंत्रणेकडे म्हणजेच ज्ञानस्रोत केंद्राकडे (केआरसी) जमा करावी लागते. ही यंत्रणा सॉफ्टवेअरच्या आधारे त्या सॉफ्ट कॉपीची तपासणी करून पीएच.डी/एम.फिल.चा शोधप्रबंध, लघुप्रबंधात एकूण १० टक्क्यांपेक्षा अधिक साधर्म्य नसल्याचे प्रमाणित करते आणि तसे प्रमाणपत्र संबंधित संशोधक छात्राला देते. त्यानंतरच त्याचा शोधप्रबंध जमा करून घेण्यात येतो.

हेही वाचाः ‘सत्यनिष्ठे’लाच तिलांजली: पीएच.डी.च्या प्रबंधातील वाङ्मयचौर्याच्या ‘कुरापती’ रोखण्याबाबत उदासीनता, यूजीसीच्या नियमांकडेच दुर्लक्ष!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील काही प्राध्यापक आणि संशोधक छात्रांच्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधांचे प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने पडताळणी करताना न्यूजटाऊनच्या हाती धक्कादायक माहिती आली आहे.

कसा दिला जातो सॉफ्टवेअरला ‘चकवा’?

विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाङ्मयचोरीची पडताळणी करतात. हे सॉफ्टवेअर त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या डेटाबेसद्वारे संबंधित शोधप्रबंधात किती टक्के साधर्म्य आहे, याचा लेखाजोखा मांडतो. या शोधप्रबंधात देण्यात आलेल्या संदर्भांच्या आधारे सॉफ्टवेअर त्या शोधप्रबंधातील साहित्याचे डेटाबेसमधील अन्य स्रोतांतील साहित्याशी तुलना करून साधर्म्य निर्देशांक निश्चित करत असते.

हेही वाचाः यूजीसीकडून कठोर निर्बंध लादूनही पीएच.डी. च्या प्रबंधात सर्रास साहित्य चोरी, बहुतांश प्रबंधात ५० ते ९४ टक्क्यांपर्यंत चौर्यकर्म!

हीच तांत्रिक बाब हेरून पीएच.डी.चे बहुतांश संशोधक छात्र त्यांच्या प्रबंधाची सॉफ्ट कॉपी सादर करताना त्यातील संदर्भच काढून टाकत असल्याचे न्यूजटाऊनच्या अध्ययनात आढळून आले आहे. त्यांच्या शोधप्रबंधाच्या हार्ड कॉपीमध्ये मात्र संदर्भसूची समाविष्ट असते. पीएच.डी. च्या शोधप्रबंधातील संदर्भच काढून टाकल्यामुळे वाङ्मयचोरीचा शोध घेणारे हे सॉफ्टवेअर त्या शोधप्रबंधातील मजकुराची त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या डेटाबेसशी तुलनाच करू शकत नाही. परिणामी संदर्भाअभावी साधर्म्य शोधण्यात अपयश आल्यामुळे या सॉफ्टवेअरकडून त्याच्या डेटाबेसशी तुलना झालेल्या साहित्याच्या आधारेच साधर्म्य निर्देशांकाचा अहवाल दिला जातो आणि त्या अहवालाच्या आधारे ज्ञानस्रोत केंद्राकडून संबंधित शोधप्रबंधामध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी साधर्म्य असल्याचे प्रमाणित केले जात आहे.

वाङ्मयचोरी शोधण्यासाठी विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांनी विकसित केलेल्या यंत्रणेतील मनुष्यबळ अगदी तांत्रिकपणे सॉफ्ट कॉपी प्राप्त होताच ती सॉफ्टवेअरवर अपलोड करतात. त्या सॉफ्ट कॉपीमध्ये संदर्भसूची समाविष्ट आहे की नाही, याची खातरजमा करण्याची तसदीही ते घेत नाहीत. त्यामुळे वाङ्मयचोरी करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे.

संदर्भसूची शोधा, अनेक महाभाग अडकतील!

वाङ्मयचोरी शोधणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाला चकवा देण्यासाठी पीएच.डी.च्या संशोधक छात्रांनी शोधून काढलेल्या या युक्तीमुळे वाङ्मयचोरी शोधणारे सॉफ्टवेअर हतबल झाले आहे. त्यामुळे २०१८ पासून आजपर्यंत केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर सादर करण्यात आलेल्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधाच्या सॉफ्ट कॉपीमध्ये संदर्भसूची आहे की नाही?  एवढीच साधी चौकशी केली तर वाङ्मयचोरीची गंभीर स्वरुपाची अनेक प्रकरणे उडकीस येण्याची शक्यता आहे. अशी झाडाझडती घेण्याची तसदी विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था घेणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!