यूजीसीकडून कठोर निर्बंध लादूनही पीएच.डी. च्या प्रबंधात सर्रास साहित्य चोरी, बहुतांश प्रबंधात ५० ते ९४ टक्क्यांपर्यंत चौर्यकर्म!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन करण्यासाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रबंधांतील साहित्य चोरी रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कठोर अधिनियम अंमलात आणण्यात आला असला तरीही पीएच.डी. च्या प्रबंधातील साहित्य चोरीच्या प्रकारांना म्हणावा तसा आळा बसू शकलेला नाही.  काही प्रबंधांमध्ये ४० ते ५० टक्के तर काही प्रबंधांमध्ये तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत साहित्य चोरी आढळून आली आहे.

साहित्य चोरी हा उच्च शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडून केला जाणारा गंभीरस्वरुपाचा व्हाईट कॉलर गुन्हा आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी यूजीसीने विद्यापीठ अनुदान आयोग (उच्च शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक सचोटीला प्रोत्साहन आणि साहित्य चोरीस प्रतिबंध) अधिनियम २०१८ लागू केला खरा, पण त्यानंतरही बहुतांश संशोधन छात्रांकडून सर्रासपणे साहित्य चोरी करून पीएच.डी.चे प्रबंध सादर केले जात आहेत.

नजीकच्या काळापर्यंत यूजीसीबरोबरच देशभरातील विद्यापीठेही संशोधनातील बनवेगिरीबाबत बेपर्वा राहिली आहेत. त्यामुळे विद्यमान अधिनियम, चौकशी आणि दंडात्मक प्रणाली अस्तित्वात आणूनही संशोधनातील बनवेगिरीला आळा बसू शकलेला नाही. संशोधनात बनवेगिरी करणारे गुन्हेगार अशा छोट्या मोठ्या गुन्ह्यातून सहजपणे निसटून जातात. त्यामुळे इतरांनाही त्याच मार्गाने जाण्यास प्रोत्साहन मिळू लागले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील ही संशोधन बनवेगिरी रोखण्यासाठी यूजीसीने पावले टाकली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २०१८ चा अधिनियम लागू करण्यात आला आहे तरीही या प्रतिबंधात्मक उपायाचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही.

न्यूजटाऊनने केस स्टडी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाशी संलग्न महाविदयालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून पीएच.डी.च्या छात्रांना संशोधनाची दिशा देणाऱ्याच्यांच पीएच.डी.च्या प्रबंधाचीच प्रगत सॉफ्टवेअरद्वारे झाडाझडती घेतली असता त्यांच्याच पीएच.डी. च्या प्रबंधात ४० ते ५० टक्क्यांपासून ते तब्बल ८४ ते ९४ टक्क्यांपर्यंत साधर्म्य निर्देशांक आढळून आला आहे. साहित्य चोरीचे हे प्रमाण धक्कादायक आहे.

या साहित्य चोरीमध्ये प्रकाशित झालेले रिसर्च पेपर्स, ब्लॉग्ज, वेबसाईट्स इत्यादींवरील मजकूराचे अख्खेच्या अख्खे पॅरेग्राफ कॉपी पेस्ट करण्यात आलेले आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये प्रबंधातील विषय परिचय, साहित्य समीक्षा आणि चर्चेचा भाग जशाच्या तसाच चोरण्यात आल्याचे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!