पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (एचएससी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा बारावीचा सरासरी निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी ९१.९५ टक्के निकाल मुंबई विभागाचा आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला.
यंदा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यात विज्ञान शाखेचे ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेचे ३ लाख ८१ हजार ९८२ विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थी, व्यावयासिक अभ्यासक्रमाचे ३७ हजार २२६ विद्यार्थी, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यर्थ्यांचा समावेश होता.
यंदाच्या निकालात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.६० टक्के आहे तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४९ टक्के आहे. म्हणजेच मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ३.८४ टक्क्यांनी अधिक आहे. विद्यार्थी पालकांना दुपारी १ वाजेनंतर mahahsscboard.in , mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल पाहता येईल.
विभागनिहाय निकाल असा
विभाग | निकाल |
कोकण | ९७.५१% |
पुणे | ९४.४४% |
नागपूर | ९२.१२% |
संभाजीनगर | ९४.०८% |
मुंबई | ९१.९५% |
कोल्हापूर | ९४.२४% |
अमरावती | ९३.०% |
नाशिक | ९४.७१% |
लातूर | ९३.३६% |
शाखानिहाय निकाल असा
कला शाखेचा निकाल ८५.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९२.१८ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९७.८२ टक्के, व्यावयासिक अभ्यासक्रमाचा निकाल ८७.७५ टक्के तर आयटीआय शाखेचा निकाल ८७.६९ टक्के लागला आहे.
राज्यात एकमेव विद्यार्थिनीला १०० टक्के गुण
या निकालाचे वैशिष्ट्ये असे की, राज्यातील नऊ मंडळांपैकी फक्त छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. शंभर टक्के गुण मिळवणारी ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत. ही विद्यार्थिनी वाणिज्य शाखेची असून खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले.
या संकेतस्थळांवर पहा निकाल
इयत्ता बारावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना दुपारी १ वाजेनंतर खालीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
- mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in