
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सोमवारी (२९ सप्टेंबर) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवल्यामुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज हे आदेश जारी केले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात मात्र सुट्टी असणार नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले असून सर्व नद्यांमध्ये विसर्ग सुरु आहे. आज रविवारी (२८ सप्टेंबर) जिल्ह्यातील ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्व प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
हवामान केंद्राने दिलेला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा आगाऊ इशारा, जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि नद्यांनी ओलांडलेली इशारा पातळी या सर्व बाबी लक्षात घेता जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सोमवारी (२९ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप स्वामी यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
पुराने वेढलेल्या ३५४ नागरिकांची सुटका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. तब्बल ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सर्वत्र नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून मदत व बचाव पथकांनी आतापर्यंत पुरात वेढल्या गेलेल्या ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका केली आहे. जायकवाडी सह जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमधून विसर्ग सुरु आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून प्रशासन सतर्क असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. शनिवारी जिल्ह्यात सायं.४ वा. पर्यंत एकूण १५ गावांमध्ये पुरात अडकलेल्या ३७९ पैकी ३५४ नागरिकांची सुखरुप सुटका करुन त्यांना सुरक्षित ठिकाणि हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात ८१८ मिली मीटर पाऊस
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५८१.२ मि.मी इतके असून आज अखेर ८१८.५ मि.मी इतके पर्जन्यमान झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ११०.३ मि.मी इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले. एकूण वार्षिक १४०.७ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८४ पैकी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आली.
जायकवाडीतून २ लाख २६ हजार ३६८ क्युसेक विसर्ग
जायकवाडी धरणाची पाणीसाठा स्थिती ९७.८० टक्के इतकी असून सध्या २ लाख २६ हजार ३६८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.पैठण तालुक्यात गोदावरी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरबाधितांची व्यवस्था प्रशासनामार्फत शाळांमध्ये करण्यात आली आहे.
प्रशासन २४ तास अलर्ट
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन जिल्हा ते गाव पातळीपर्यंत २४ तास अलर्ट आहे. सर्वच अधिकारी, कर्मचारी यांना आपापल्या मुख्यालयी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. प्रत्येक आपत्तीच्या ठिकाणी वेळीच आगाऊ सुचना देऊन नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. प्रतिसाद कालावधी शून्यावर आणण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिवितहानी रोखणे हा पहिला उद्देश आहे,असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाला सहयोग द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री जिल्हाप्रशासनाच्या संपर्कात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून दुरध्वनीवरुन मदत व बचाव कार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्री कार्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दर दोन तासाला अहवाल पाठविला जात आहे. जिल्ह्यातील मदत व बचाव कार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
पालकमंत्री स्वतः मदत व बचाव कार्यात
जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. पालकमंत्री स्वतः अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून मदत व बचाव कार्यावर लक्ष देऊन होते. नारायणपुर येथे आ. रमेश बोरनारे हे त्यांच्या समवेत होते.
६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यातील एकूण ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेली तालुकानिहाय मंडळे अशीः
छत्रपती संभाजीनगर तालुका: छत्रपती संभाजीनगर: ८७.८ मि.मी., उस्मानपुरा: ९७.५ मि.मी., भावसिंगपुरा: ९९.५ मि.मी., कांचनवाडी: १४२.५ मि.मी., चिकलठाणा: ६६.० मि.मी., चौका: १००.० मि.मी., पंढरपूर: ८२.३ मि.मी., पिसादेवी: ६६.५ मि.मी.,वरूड काझी: ६६.५ मि.मी.
पैठण तालुका: आडूळ: ८७.० मि.मी., पैठण: ६९.५ मि.मी., पाचोड: ६९.८ मि.मी.
गंगापूर तालुका: गंगापूर: १४८.५ मि.मी., मांजरी:१५१.० मि.मी., भेंडाळा: १५६.३ मि.मी., शेंदुरवाडा: ९९.५ मि.मी., तुर्काबाद: १६५.० मि.मी., वाळूज: १२६.८ मि.मी., हर्सूल:१९६.३ मि.मी., डोणगाव:१९३.३ मि.मी., सिद्धनाथ: १५०.८ मि.मी., आसेगाव: ११८.० मि.मी., गाजगाव: १५०.८ मि.मी., जामगाव: १४८.५ मि.मी.
वैजापूर तालुका: वैजापूर: १७४.८ मि.मी., खंडाळा: १७२.५ मि.मी., शिऊर: १८९.३ मि.मी., बोरसर: १८९.३ मि.मी., लोणी: १७२.० मि.मी., गारज: १५१.० मि.मी.
गंगापूर तालुकाः लासूरगाव: १२७.८ मि.मी., महालगाव: १७३.३ मि.मी., नागमठाण: १७३.३ मि.मी., लाडगाव: १७३.३ मि.मी., गायगाव: १६४.८ मि.मी., जाणेफळ: १७५.० मि.मी., भाटतारा: १७१.० मि.मी.
कन्नड तालुकाः कन्नड: १३५.३ मि.मी., चापानेर: १३५.३ मि.मी., देवगाव: १६६.० मि.मी., चिकलठाणा: ११७.० मि.मी., पिशोर: १२६.५ मि.मी., नाचणवेल: १२५.३ मि.मी., चिंचोली: १२०.८ मि.मी., करंजखेड: १३९.५ मि.मी., नागद: ८५.५ मि.मी.
खुलताबाद तालुकाः वेळू: १८०.८ मि.मी., सुलतानपूर: ११०.० मि.मी., बाजार: १०५.० मि.मी.
सिल्लोड तालुकाः सिल्लोड: १५९.८ मि.मी., निल्लोड: १२२.३ मि.मी., भराडी: ९०.० मि.मी., गोळेगाव: ७१.० मि.मी.,अजिंठा: ७१.५ मि.मी., आमठाण: ७८.५ मि.मी., बोरगाव: ७८.५ मि.मी., आंबई: ७८.५ मि.मी., पालोदः ७४.३ मि.मी., शिवना: ७१.५ मि.मी., उडणगाव: ७१.० मि.मी.
सोयगाव तालुकाः सोयगाव: ६८.५ मि.मी., बनोटी: १०३.८ मि.मी., जरांडीः ६६.० मि.मी.
फुलंब्री तालुकाः फुलंब्री: १२६.३ मि.मी., आळंद: ११३.५ मि.मी., पीरबावडा: १०९.५ मि.मी., वडोदबाजार: १२१.० मि.मी., बाबरान: १३१.० मि.मी.
पुरस्थितीत अशी घ्या काळजी
काय करावे?
- गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा.
- विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.
- गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे.
- गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.
- पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा.
- घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा.
- कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.
- पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा),
- कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा.
- पूरस्थितीत घाबरून जाऊ नका, सूचनांचे पालन करा.
- मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हा आपत्ती निवारण कक्ष येथे ०२४०-२३३१०७७ या क्रमांकावर अथवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षितस्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा.
- कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांना बांधून ठेवू नये त्यांना खुले सोडावे.
- प्राणी खुले सोडल्याने ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतील.
- सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ. संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.
काय करू नये?
- पूर असलेल्या भागात, नंदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका.
- पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका. तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.
- दूषित/उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका.
- पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका.
- जलसाठ्याजवळ/नदीजवळ जाऊ नये.
- आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये.
- मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव जनार्दन विधाते यांनी केले आहे.
