
मुंबई/छत्रपती संभाजीनगरः अतिवृष्टीच्या तडाख्याने पिकांची माती आणि स्वप्नांचा चिखल झालेल्या अर्ध्या अधिक मराठवाड्याने पाऊस काळ होऊन येण्याच्या धास्तीने शनिवारची रात्र अक्षरशः जागून काढली. दरम्यान आजही (२८ सप्टेंबर) मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत मुसळधार तर उर्वरित दोन जिल्ह्यात मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारनंतर मराठ्यातील पाऊस ओसरण्याची चिन्हे आहेत.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मराठवाडा अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील लाखो हेक्टर शेतातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल झाला. पुराच्या पाण्यात मराठवाड्यातील जनतेची स्वप्ने वाहून तर गेलीच आता आपल्या आणि आप्तस्वकियांच्या जिविताची काळजी मराठवाड्यातील जनतेचे काळीज पोखरू लागली आहे. परिणामी शनिवारी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी-हिंगोली जिल्ह्यासह अर्ध्याअधिक मराठवाड्यातील जनतेने शनिवारची रात्र अक्षरशः जागून काढली आहे.
गेल्या काही दिवसांपासूनच पाऊस आधीच घायकुतीला आलेल्या मराठवाड्याची पाठ सोडायला तयार नाही. शनिवारी मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना धो-धो झोडपून काढल्यानंतर आजही (२८ सप्टेंबर) मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवारी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, बीड, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद) या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर लातूर आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुढचे पाच दिवस असे राहील पाऊसमान
रविवार, २८ सप्टेंबरः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अत्यधिक पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी २०० मिली मीटरपेक्षाही जास्त पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, सातारा घाटमाथा या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, कोल्हापूर घाटमाथा या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भासाठी कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
सोमवार, २९ सप्टेंबरः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे.
मंगळवार, ३० सप्टेंबरः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भासाठी कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
बुधवार, १ ऑक्टोबरः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विजांचा कडकड आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
गुरूवार, २ ऑक्टोबरः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील पाऊस ओसरणार
आज मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असली तरी उद्या सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. सोमवारनंतर मात्र मराठवाड्याच्या बहुतांश भागातून पाऊस ओसरण्याची शक्यता आहे. हवामानाच्या परिस्थितीत वेगाने बदल होऊ लागलेले असल्यामुळे या परिस्थितीत बदल होण्याचीही शक्यता आहे.
