
नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विजयादशमीच्या दिवशी होणाऱ्या शताब्दी सोहळ्याला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि दिवंगत माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी कमलाताई गवई या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
१९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यावर्षी आरएसएसच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे आरएसएसचा शताब्दी सोहळा साजरा केला जाणार आहे. नागपूरमध्ये २ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शताब्दी वर्ष सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील स्वयंसेवक इच्छूक आहेत. परंतु मैदानाची मर्यादा पाहता सर्वांना प्रवेश देणे शक्य नसल्यामुळे यावर्षी नागपूरसह देशभरात आरएसएसच्या शाखा असणाऱ्या विविध भागामध्ये शताब्दी सोहला साजरा केला जाणार आहे. या ठिकाणी पथसंचलन करत शताब्दी सोहळा साजरा केला जाणार आहे.
२ ऑक्टोबर रोजी नागपुरात साजऱ्या होणाऱ्या शताब्दी सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर ५ ऑक्टोबरला अमरावती येथे शताब्दी विजयादशमी सोहळा साजरा होणार असून या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी कमलाताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दिवंगत माजी राज्यपाल रा. सु. गवई यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. याच स्मारक समितीने दीक्षाभूमीची उभारणी केली आहे. सध्या गवई यांचे चिरंजीव राजेंद्र गवई हे या स्मारक समितीचे सदस्य आहेत. अशा परिवारातील कमलाताई गवई या आरएसएसच्या शताब्दी विजयादशमी सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दीक्षाभूमी हे नागपूरचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तो दिवसही विजयादशमीचाच होता. त्यामुळे दरवर्षी दीक्षाभूमीवर देशभरातील लाखो बौद्ध उपासक येतात आणि येथे प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
दुसरीकडे याच दिवशी आरएसएस नागपुरात पथसंचलन करून विजयादशमी सोहळा साजरा करते. दीक्षाभूमीच्या उभारणीत योगदान देणाऱ्या गवई परिवारातील कमलाताई गवई अमरावती येथे होणाऱ्या आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
