मुंबईः मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जाऊन एका अज्ञात महिलेने तोडफोड केली. घोषणाबाजी करत या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर लागलेला त्यांच्या नावाचा बोर्डही उखडून फेकून दिला. विशेष म्हणजे ही महिला मंत्रालयात विनापास घुसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
गुरूवारी एका महिलेने मंत्रालयाचा पास न काढताच गेटमधून मंत्रालयात प्रवेश केला. या महिलेने सचिव गेटमधून विनापास मंत्रालयात एन्ट्री मिळवली. त्यानंतर ती थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहोचली. तेथे तिने घोषणाबाजी करत कार्यालयात तोडफोड करत नासधूस केली. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा बोर्डही काढून फेकून दिल्याची माहिती समोर येत आहे.
या अज्ञात महिलेने मंत्रालयात विनापास सचिव गेटमधून एन्ट्री कशी मिळवली? मंत्रालयातील सुरक्षेतील ही गंभीर आणि मोठी चूक असल्यामुळे पोलिस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी पाऊस असल्यामुळे मंत्रालयात वर्दळ कमी होती. पावसामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी लवकर घरी पोहोचण्याच्या तयारीत असतानाच सायंकाळी साडेवाजताच्या सुमारास एक महिला फडणवीस यांच्या कार्यालयात घुसली आणि तिने आरडाओरड, घोषणाबाजी करत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांनी या महिलेची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत या महिलेने झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या. दालनाबाहेर असलेली फडणवीस यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली. पोलिस येईपर्यंत त्या अज्ञात महिलेने पोबारा केला. रात्री उशीरापर्यंत ही महिला कोण होती, याचा शोध लागू शकला नाही.