पुढील दोन दिवस विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पाऊस तर मुंबईला अतिवृष्टीचा इशारा; जायकवाडी, मांजरा धरणाचे दरवाजे उघडले


मुंबईः मागील दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागाला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी आणि मांजरा नदीत पाण्याची आवक वाढल्यामुळे जायकवाडी आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाड्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात खरिपाच्या हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी राज्याच्या बहुतांश भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही दिवस मराठवाड्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. पुढील दोन दिवसही म्हणजेच शुक्रवार आणि शनिवारी मराठवाड्याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

चक्राकार वाऱ्याची स्थिती विदर्भ आणि लगतच्या भागात सक्रीय आहे. त्यामुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

आज मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात आकाश निरभ्र आहे. सूर्य तापू लागला आहे आणि मध्येच आकाशात ढगांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.मराठवाड्यातील काही भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आहे. सायंकाळी काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

जायकवाडी, मांजरा धरणाचे दरवाजे घडले

मागील दोनदिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जालना, लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा नदी दुथडी भरून वहात आहे. त्यामुळे मांजरा धरण ९६टक्के भरले असून या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा केला जातो.

गोदावरी नदीतही पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे ११ दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. जायकवाडीतून गोदावरी नदीत ११ हजार २०० दशलक्ष लिटर प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी

मागील दोन दिवस मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या पिकाची अक्षरशः माती झाली आहे. पुढचे दोन दिवसही मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे खरिपाचे आणखी नुकसान होण्याचा धोका आहे. मात्र रब्बीचा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!