पुणेः निसर्गाला शब्दांत बोलते करणारे, डोलवणारे आणि नाचवणारे रानकवी, ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. उर्फ नामदेव धोंडो महानोर यांचे आज (जुलै) निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पळसखेडा या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गीतांतून मातीचा गंध देणारे आणि तरल काव्यासाठी ओळखले जाणारे महानोर यांनी काव्यप्रेमी मराठी रसिकांच्या मनात हक्काचे स्थान प्राप्त केले होते. महानोर यांनी कवितांबरोबरच चित्रपटांसाठीही गीत लेखन केले आहे. ना. धों. महानोरांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध येत असे. निसर्गाला शब्दात बोलते कऱणे, आपल्या शब्दांवर डोलवणे आणि नाचवण्याचे लिलया कसब महानोरांमध्ये होते.
महानोरांनी जशा निसर्ग कविता लिहिल्या तशाच ठसकेबाज लावण्याही लिहिल्या आहेत. श्रावणातील उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीच्या नाजूकपणाचा साज एकत्रितपणे चितारणारी ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना’ ही त्यांची लोकप्रिय झालेली ठसकेबाज लावणी. ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी ही लावणी गायली आहे.
चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, किती जीवाला राखायचं राखलं अशी एकाहून एक सरस गाणी ना. धों. महानोरांनी लिहिली आहेत. मराठी रसिकांच्या मनावर या गीतांना गारूड केलं आहे.
ना. धो. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ‘अजिंठा’ या त्यांच्या दीर्घ काव्यसंग्रहाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता हे त्यांचे काही प्रसिद्ध कावितासंग्रह आहेत. गपसप, गावातल्या गोष्टी हे त्यांचे कथासंग्रहही आहेत.
१६ सप्टेंबर १९४२ रोजी जन्मलेल्या महानोरांनी बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. महानोरांनी आपल्या साहित्यात मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला. पानझड, तिची कहाणी, पळसखेडची गाणी हे महानोरांनी लिहिलेला मराठवाडी लोकगीतांचा खजिनाच आहे.
सुमारे हजार लोकसंख्या असलेले पळसखेड हे गाव महानोरांच्या कवितांमुळे सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी जगाच्या नकाशावर आले. महानोरांनी माती आणि शेतीची नाळ कधीच तुटू दिली नाही. त्यामुळे त्यांनी पळसखेडमध्ये शेतीचे विविध प्रयोग केले. त्यांचे कृषी धोरणाकडे विशेष लक्ष असायचे.
महानोरांनी पळसखेडमध्ये महात्मा फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू केले. हे वाचनालय पळसखेडमधील सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे केंद्र ठरले आहे. साहित्याबरोबरच महानोरांनी राजकीय क्षेत्रातही काम केले. १९७८ मध्ये महानोरांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु निवडणुकीच्या राजकारणात ते कधीच पडले नाही.
… हा योग मनाला चटका लावून जाणारा-शरद पवार
ना.धो. महानोर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळचे मैत्र होते. या जवळच्या मित्राच्या निधनानंतर शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोरांचे निधन पावसाळ्यात व्हावे, हा योग मनाला चटका लावून जाणारा आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो.च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैतसारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले, असे शरद पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
ना. धों.ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धों.खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों.चे निधनदेखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.