महायुतीतील पहिले बंड मराठवाड्यात, अजित पवारांचे खंदे समर्थक आ. सतीश चव्हाण गंगापूरमधून अपक्ष लढणार; भाजपला देणार आव्हान!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाच सत्ताधारी महायुतीमध्ये आतापासूनच बंडाचे निशाण फडकू लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात दंड थोपटले असून या मतदारसंघातून त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

भाजपचे आमदार प्रशांत बंब हे २००९ पासून या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  २००९ मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. २०१४ व २०१९ अशा दोन निवडणुकांपासून ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर व्हायचा आहे. अशातच आता आ. सतीश चव्हाण यांनी गंगापूर-खुलताबादमध्ये आ. प्रशांत बंब यांच्याविरुद्ध दंड थोपटत अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली आहे.

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक का लढवणार? याबाबतची भूमिकाही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मी मतदारसंघात काम करत आहे. मतदारसंघात मोठी अस्वस्थता आहे. गंगापूरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. गेल्या १५ वर्षांपासून कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. लोकांना आता बदल हवा आहे, असे आ. सतीश चव्हाण म्हणाले.

गंगापूरमध्ये भाजपचा विद्यमान आमदार असताना आणि जेथे ज्याचा विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाला असा सिटिंग-गेटिंगचा फॉर्म्युला असताना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार का? असे विचारले असता आता तसे काही राहिलेले नाही. हल्ली सर्वेक्षणाचा जमाना आहे. ज्यांचे नाव सर्वेक्षणात असते, त्याला पक्ष उमेदवारी देत असतो. त्यात मीच आघाडीवर राहीन असे वाटते. आता लढावे तर लागेल ना, असे म्हणत आ. सतीश चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती तेव्हापासूनच आ. सतीश चव्हाण गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून तयारीला लागले आहेत. अजित पवारांनी काकांविरुद्ध बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तेव्हा आ. सतीश चव्हाण हे अजित पवारांबरोबर गेले. ते अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात. अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. आगामी विधानसभा निवडणूक ते महायुती म्हणूनच लढवणार आहेत.

…पण ‘तुतारी’ वाजलीच नाही!

महायुतीत गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार नाही, अशी खात्री पटल्यानंतर आ. सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करत ‘तुतारी’ चिन्हावर गंगापूरमधून उमेदवारी मिळवण्याची धडपड करून पाहिली, परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता त्यंनी अपक्षच निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चालवली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!