सत्यशोधक मार्क्सवादी नेत्या सरोज कांबळे मृत्यूप्रकरणः अत्यवस्थ प्रा. रणजित परदेशींना घेऊन इनायत परदेशी फरार, घर कुलुपबंद!


धुळेः कॉ. शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या आघाडीच्या नेत्या आणि अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक-विचारवंत सरोज कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी धुळे पोलिसांकडून तपासात कोणताही पुढाकार घेतला जात नसतानाच या प्रकरणात संशयाची सुई असलेला त्यांचा मुलगा इनायत परदेशी हा  अत्यवस्थ अलेले त्याचे वडिल आणि सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीचे नेते प्रा. रणजित परदेशी यांना घेऊन बुधवारी सकाळी अचानक फरार झाला आहे. आई सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी आपणाला अटक होऊ शकते, या भीतीमुळे इनायत फरार झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता प्रा. रणजित परदेशी यांच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे.

सरोज कांबळे यांचा ५ जून रोजी धुळ्यात संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल संशय आल्यामुळे एका कार्यकर्त्याने पोलिसांना कळवले. प्रारंभी पोलिसांनी हे कौटुंबिक प्रकरण असल्यामुळे सरोज कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. परंतु त्या कार्यकर्त्याने रेटा लावल्यामुळे पोलिस घटनास्थळी आले. त्यावेळी सरोज कांबळे यांच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती आणि त्यांचा मृतदेह शववाहिनीवर ठेवण्यातही आला होता.

हेही वाचाः सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या सरोज कांबळे यांचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवाल गुलदस्त्यात!

तेथे असलेल्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला शवविच्छेदन करायचे नाही, तुम्ही निघून जा, असे पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील कार्यकर्ते आणि शवविच्छेदनावर ठाम असलेला कार्यकर्ता यांच्यात बाचाबाचीही झाली होती. नंतर सचिन सोनवणे यांनी पोलिस अधीक्षकांना फोन करून विनंती केल्यानंतर पोलिसांनी सरोज कांबळे यांचा मृतदेह शववाहिनीवरून खाली उतरवून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर ६ जून रोजी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरोज कांबळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तो शवविच्छेदन अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे.  

सरोज कांबळे यांच्या मृत्यूची बातमी राज्यस्तरीय माध्यमांमध्ये तर सोडाच पण स्थानिक दैनिकातही प्रसिद्ध झाली नाही. न्यूजटाऊनने ९ जून रोजी सरोज कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूला वाचा फोडली आणि मुलगा इनायत परदेशी सरोज कांबळे यांचा किती अमानवी पद्धतीने छळ करत होता, याचा वृत्तांत महाराष्ट्रापुढे पुराव्यानिशी मांडला. तेव्हा कुठे परिवर्तनवादी, मार्क्सवादी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना सरोज कांबळे यांचा मृत्यू कळला आणि पोटच्या मुलाकडूनच त्यांचा होणारा अमानुष छळही समजला.

हेही वाचाः मुलगा ईनायत परदेशीच करायचा सत्यशोधक विचारवंत सरोज कांबळे यांचा अमानुष छळ; धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनकडे!

सरोज कांबळे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळेच पोलिसांनी शवविच्छेदन केले. परंतु नंतर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालच मिळाला नसल्याचे सांगत याप्रकरणी चौकशीही सुरू केली नाही. दरम्यान न्यूजटाऊनने या घटनेमागील सत्य निर्भयपणे मांडल्यानंतर सरोज कांबळे यांचा मुलगा इनायत परदेशीच्या मनात आपणास कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी भीती निर्माण झाली. त्या भीतीपोटीच तो वडिल प्रा. रणजित परदेशी यांना घेऊन बुधवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान फरार झाला आहे.

प्रा. रणजित परदेशी हे गंभीररित्या आजारी असून गेल्या कित्येक महिन्यांपासून ते बिछान्यालाच खिळलेले आहेत. त्यांना चालता येत नाही. त्यांच्या नैसर्गिक विधीही बिछान्यावरच आटोपून घ्याव्या लागतात. एवढ्या अत्यवस्थ असलेल्या प्रा. रणजित परदेशींना घेऊन इनायत परदेशी अचानक कुठे फरार झाला? याचा थांगपत्ता धुळ्यातील कार्यकर्त्यांना लागला नाही. त्यामुळे सरोज कांबळे यांच्या मृत्यूनंतर मूग गिळून गप्प बसलेल्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना आता प्रा. रणजित परदेशी यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली आहे.

सत्यशोधकी कार्यकर्त्यांच्या ‘लढाऊपणा’चे ढोंग उघड

आम्ही शोषित-वंचितांचे लढे नेटाने लढतो, असे सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील कार्यकर्ते उर बडवून कायम सांगत असतात. शोषणविरहित, अन्यायमुक्त समाजाच्या निर्मितीची भाषाही बोलतात. त्यासाठी ते कधी आक्रमक झालेलेही दाखवतात, परंतु सरोज कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणात हे सगळेच कार्यकर्ते मूग गिळून गप्प बसले.

हेही वाचाः सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी तपासात हस्तक्षेप करणाऱ्याना आरोपी कराः दिशा पिंकी शेख; सत्य महाराष्ट्राला सांगाः प्राचार्य कांबळे

 एकाही कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन सरोज कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा आणि मृत्यूनंतर तरी त्यांना न्याय द्या, अशी भूमिका घेतली नसल्यामुळे सत्यशोधक मार्क्सवादी कार्यकर्त्यांचा कथित लढाऊपणा ढोंगी आणि कथित आक्रमकता बेगडी होती, हे स्पष्ट झाले आहे.

सरोज कांबळे या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या आणि विचारवंत तर होत्याच शिवाय त्या हजारो आधारवंचित लेकरांच्या आईही होत्या. या चळवळीचे मातृत्व स्वीकारून त्यांनी आजघडीला सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीत कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आईच्या ममतेने घडवले. त्यांना दिशा दिली. अनेकांचे संसार उभे केले.

त्या एकाही कार्यकर्त्याला सरोज कांबळे यांच्या मृत्यूनंतर कंठ फुटला नाही. उलट हे प्रकरण दडपून इनायत परदेशीला सुरक्षित करण्याचीच भूमिका अनेकांनी घेतली. त्यामुळे पदरमोड करून कार्यकर्ते घडवण्याचा सरोज कांबळे आणि प्रा. रणजित परदेशी यांचा जो हेतू होता, त्या हेतूची साध्यता झालीच नाही, हेही या निमित्ताने पुढे आले आहे. आता सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीचे कार्यकर्ते कोणत्या तोंडाने शोषित-वंचितांच्या लढ्याचे नेतृत्व करणार आहेत? त्यांना त्याचा नैतिक अधिकार तरी पोहोचतो का?  असे अनेक प्रश्नही सरोज कांबळे यांच्या मृत्यूनंतर उपस्थित झाले आहेत.

सरोज कांबळे यांच्या नावे असलेले धुळ्यातील हे घर बुधवारी सकाळपासूनच कुलुपबंद आहे.

 धुळे पोलिसांची बघ्याची भूमिका इनायतच्या पथ्यावर

 सरोज कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ६ जून रोजी करण्यात आले. सर्वसाधारणपणे शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल शवविच्छेदन केल्याच्या दिवशीच पोलिसांकडे सुपूर्द केला जातो. परंतु आठवडा उलटला तरीही प्राथमिक अहवालच मिळाला नसल्याचे सांगत सरोज कांबळे मृत्यूप्रकरणात धुळे पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याऐवजी पोलिसांनी कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाची चक्रे फिरवली असती तर सरोज कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी तपासाला गती मिळाली असती.

सरोज कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणावर असलेले संशयाचे मळभ दूर करण्यासाठी त्यांचा मुलगा इनायत परदेशी याचीही चौकशी करता आली असती. परंतु धुळे पोलिसांनी यापैकी काहीच केले नसल्यामुळे इनायत परदेशीला फरार होण्याची सुरक्षित संधी मिळाली.

न्यूजटाऊनने हे प्रकरण लावून धरल्यामुळे आणि समाज माध्यमावर काही कार्यकर्ते उघडपणे सरोज कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणाला इनायत परदेशीलाच जबाबदार धरू लागल्यामुळे आपणाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी भीती इनायत परदेशीच्या मनात निर्माण झाली आणि गेली चार-पाच वर्षे आईवडिलांना प्रचंड दहशतीखाली जगण्यास भाग पाडणारा इनायत अटकेच्या भीतीने स्वतःच दहशतीखाली आला आणि फरार झाला. तो कुठे गेला? कसा गेला? त्याला धुळे सोडण्यास कुणी मदत केली? याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!