सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी तपासात हस्तक्षेप करणाऱ्यांना आरोपी कराः दिशा पिंकी शेख; सत्य महाराष्ट्राला सांगाः प्राचार्य कांबळे


मुंबई/पुणेः  कॉ. शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी नेत्या आणि अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक, विचारवंत सरोज कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण न्यूजटाऊनने उजेडात आणल्यानंतर डावी-परिवर्तनवादी चळवळ स्तंभित झाली असून महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सरोज कांबळे यांचा मृत्यू संशयास्पद असून तटस्थ यंत्रणेमार्फत या मृत्यूप्रकरणाचा तपास व्हावा आणि या तपासात हस्तक्षेप करणाऱ्यांना आरोपी, सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा पिंकी शेख यांनी केली आहे.

सरोज कांबळे यांचा ५ जून रोजी धुळ्यात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे धुळे पोलिसांनी सरोज कांबळे यांचा शववाहिनीवर ठेवलेला मृतदेह उतरवून त्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि शवविच्छेदनानंतर मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरोज कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

हेही वाचाः सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या सरोज कांबळे यांचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवाल गुलदस्त्यात!

चळवळीसाठी उभे आयुष्य समर्पित करणाऱ्या सरोज कांबळे यांच्या मृत्यूची चारओळीची बातमीही कुठल्याही माध्यमात प्रकाशित झाली नाही. एवढी गोपनीयता सरोज कांबळे यांच्या मृत्यूबाबत बाळगण्यात आली होती. परंतु न्यूजटाऊनकडे याबाबतचा तपशील प्राप्त होताच पहिल्यांचा न्यूजटाऊनने सरोज कांबळे यांच्या मृत्यूला वाचा फोडली आणि महाराष्ट्रभरातील चळवळीतील कार्यकर्ते हादरून गेले आहेत. सरोज कांबळे यांच्या धक्कादायक मृत्यूबद्दल संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत.

 वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा पिंकी शेख यांनी सरोज कांबळे यांच्या मृत्यूबाबत न्यूजटाऊनने प्रकाशित केलेल्या दोन्ही बातम्या फेसबुकवर शेअर करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचाः मुलगा ईनायत परदेशीच करायचा सत्यशोधक विचारवंत सरोज कांबळे यांचा अमानुष छळ; धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनकडे!

‘कॉ. सरोज कांबळे यांच्या मृत्यूची घटना संशयास्पद आहे. तरीही तटस्थ तपासात कुणी हस्तक्षेप करत असेल तर त्यांना आरोपी, सहआरोपी करायला हवे,’ असे प्रतिक्रिया दिशा पिंकी शेख यांनी नोंदवली आहे.

इनायतला सत्यशोधक इतिहास कधीच माफ करणार नाही!

सरोज कांबळे यांचा मुलगा इनायत परदेशी याने केलेल्या अमानुष छळाचा भंडाफोड न्यूजटाऊनने पुराव्यानिशी केला आहे. सरोज कांबळे यांच्या अमानवी छळाची छायाचित्रे आणि त्यांनी लिहून ठेवलेल्या तक्रारीत सांगितलेली आपबितीच न्यूजटाऊनने महाराष्ट्रासमोर मांडली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यावरही दिशा पिंकी शेख यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘ हजारो लेकरांना माणुसकी शिकवणाऱ्याच्या पोटी असा नराधम जन्माला यावा हे फार वाईट आहे.. इनायत तुला महाराष्ट्राचा सत्यशोधक इतिहास कधीच माफ करणार नाही,’ असे दिशा पिंकी शेख यांनी म्हटले आहे.

सत्यशोधक कार्यकर्त्यांनी खुलासा करावाः प्राचार्य म.ना. कांबळे

सरोज कांबळे यांचा संशयास्पद मृत्यू ही खूप गंभीर बाब आहे. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी यासंबंधी जास्त खुलासा केला पाहिजे. किमान सत्य काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडले पाहिजे, अशी मागणी बहुजन विद्वत सभेचे प्राचार्य म.ना. कांबळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

सरोज कांबळे यांच्या मृत्यूला इनायत परदेशी जबाबदार असेल किंवा नसेल याचे सत्यशोधन झाले पाहिजे. कॉ. किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी, भगवान चित्ते, दिलीप जाधव, किशोर जाधव, प्रा. श्रावण देवरे, सिद्धार्थ जगदेव या मंडळींनी खुलासा करावा, अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. कारण जी माहिती समोर येते आहे, ती चिंताजनक आहे, असे प्राचार्य म.ना. कांबळे यांनी म्हटले आहे.

धुळे पोलिसांवर कोणाचा दबाव?

सरोज कांबळे यांचा मृत्यू आणि त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून आठवडा उलटला तरी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगत पोलिसांनी चौकशीही सुरू केलेली नाही. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? कायदेशीर प्रक्रियेनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करून धुळे पोलिसांनी तपास का सुरू केला नाही? पोलिसांना प्राथमिक शवविच्छेदन अहवालही मिळू नये म्हणून कोणी सक्रीय आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!