भाजपने एकनाथ शिंदे, अजित पवारांना स्टारप्रचारकांच्या यादीतून वगळले!


मुंबईः लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचत असतानाच भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या स्टारप्रचारकांच्या यादीतून वगळून टाकले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर भाजपने हे पाऊल उचलले आहे. केवळ आपल्याच पक्षातील नेत्यांचा स्टारप्रचारकांच्या यादीत समावेश असावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यापार्श्वभूमीवर या दोघांची नावे भाजपने वगळली आहेत.

राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५० मधील तरतुदींनुसार स्टारप्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहिजे, असा नियम आहे. या तरतुदींनुसार कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

भाजपने २६ मार्च रोजी ४० स्टारप्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. या यादीत महाराष्ट्राच्या बाहेरील २० प्रचारक आणि राज्यातील २० प्रचारकांचा समावेश होता. यादीत पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर दुसरे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होते. आता भाजपने स्टारप्रचारकांची नवीन यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्टारप्रचारक देशभर भाजपचा प्रचार करणार आहेत.

शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र भाजपच्या स्टारप्रचारकांच्या यादीत इतरही नेत्यांचा समावेश करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या यादीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाने आक्षेप घेतल्यानंतर हे स्टारप्रचारक शिवसेनेचे प्राथमिक सदस्य आहेत का? हे स्पष्ट करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला दिले होते.

आपल्या पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षांच्या नेत्यांची नावे स्टारप्रचारकांच्या यादीत समाविष्ट करणे हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ चे उल्लंघन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) म्हटले होते. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे नाव वगळले आहे.

भाजपचे स्टारप्रचारक असलेले नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यात जाऊनही प्रचार करणार आहेत. गडकरी हे मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाही मध्यप्रदेशात स्टारप्रचारक म्हणून नेमण्यात आले आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टारप्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.