मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार, निवडणूक प्रचाराच्या नियमांतही सुधारणा


मुंबई: ग्रामीण आणि शहरी भागातील मोबाइलचा वाढता वापर लक्षात घेता मतदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर मोबाइल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने प्रचारासाठीच्या नियमातही सुधारणा करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

मोबाईल फोनचा वाढता वापर लक्षात घेता, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहील.

मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मोबाईल ठेवण्याची ही सुविधा दिली जाणार असून, मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी याला अपवाद देऊ शकतात. मतदान गुप्ततेचा नियम (नियम ४९ एम) यापुढेही काटेकोरपणे पाळला जाणार आहे.

मतदान केंद्राच्या १०० मीटर आत प्रचारास मनाई

प्रचाराच्या संदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत प्रचारास मनाई करण्यात आली आहे. मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र (VIS नसल्यास) देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत. हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ यांच्याशी सुसंगत आहेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली, भारत निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबवत असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!