चिंताजनक! शेतकऱ्यांपेक्षाही विद्यार्थी आत्महत्यांमध्ये लक्षणीय वाढ, देशात महाराष्ट्र आघाडीवर!


नवी दिल्ली: देशातील विद्यार्थी आत्महत्येच्या प्रमाणात धक्कादायकरित्या वाढ झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे देशातील एकूण लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूण आत्महत्येच्या तुलनेत विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या महाराष्ट्रातील असून हे प्रमाण शेतकरी आत्महत्यांपेक्षाही जास्त आहे. 

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) माहितीवर अधारित ‘विद्यार्थी आत्महत्या: भारतात पसरलेली महामारी’ नावाने अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अहवाल वार्षिक आयसी-३ कॉन्फरन्स आणि एक्सो २०२४ मध्ये बुधवारी सादर करण्यात आला.

देशातील एकूण आत्महत्यांच्या संख्येत वार्षिक २ टक्के वाढ झालेली आहे तर विद्यार्थी आत्महत्यांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. विद्यार्थी आत्महत्यांची प्रकरणे कमी नोंदली जातात, त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थी आत्महत्येची संख्या जास्त असू शकते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार, २०२२ मध्ये भारतात १० हजार ४४ विद्यार्थी आत्महत्या झाल्या आहेत. २०२१ मध्ये ही संख्या ८९ होती. म्हणजेच २०२२ मध्ये विद्यार्थी आत्महत्यांत किंचित घट झाली आहे. 

मागच्या काही वर्षांतील आत्महत्येचे आकडे हे लोकसंख्या वाढीच्या दरालाही मागे टाकणारे आहेत. मागच्या दशकात ० ते २४ वयोमानादरम्यानची लोकसंख्या ५८२ दशलक्षावरून घसरून ५८१ दशलक्षावर आली आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी आत्महत्यांची संख्या ६ हजार ६५४ वरून १३ हजार ४४ वर पोहोचली आहे. 

कोटा नव्हे महाराष्ट्र अव्वल

वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्र, तामीळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यात झाल्या आहेत. विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.एकूण विद्यार्थी आत्महत्यांच्या १४ टक्के विद्यार्थी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. 

महाराष्ट्रात १ हजार ७६४ (एकूण आत्महत्यांच्या १४ टक्के), तामिळनाडूत १ हजार ४१६ (११ टक्के), मध्य प्रदेशात १ हजार ३४० (१० टक्के), उत्तर प्रदेशात १ हजार ६० (८ टक्के), झारखंडमध्ये ८२४ (८ टक्के) झाल्या आहेत.

विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण ७.६ टक्के

राजस्थानमधील कोटा शहरात ५७१ विद्यार्थी आत्महत्यांची नोंद झाली. विद्यार्थी आत्महत्यांमध्ये कोटा १० व्या क्रमांकावर आहे. कोटा शहरात जेईई, नीटचे अनेक क्लासेस आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी कोटा शहरात येतात.

देशातील एकूण आत्महत्यांच्या तुलनेत विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण ७.६ टक्के आहे. ही टक्केवारी शेतकरी, बेरोजगार व स्वयंरोजगाराच्या आत्महत्यांच्या तुलनेत अधिक आहे. 

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!