बारसूतील रिफायनरीविरोधी आंदोलन चिघळलेः पोलिस आणि आंदोलकांत जोरदार राडा, ग्रामस्थांवर लाठीमार

रत्नागिरीः  रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरीविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन चिघळू लागले आहे. रिफायनरी सर्वेक्षणावरून आंदोलक आणि पोलिसांत आज जोरदार राडा झाला. सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांना लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या बारसूमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथे तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

रिफायनरीसाठी सुरू असलेले सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी आंदोलक सर्वेक्षणस्थळी पोहोचले. त्यांना तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी अडवून मज्जाव केला. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि आंदोलकांवर लाठीमारही केला. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे बारसू येथे आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राऊत हे रस्त्यावरच ठाण मांडून बसल्यानंतर पोलिसांनी त्यांना आत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्पस्थळी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वातारवण तापू लागले आहे. आक्रमक ग्रामस्थांनी आज प्रकल्पस्थळी जाऊन सर्वेक्षण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला.

पोलिसांनी बळाचा वापर करूनही एकही आंदोलक जागचा हलला नाही. तीव्र उष्णतेमुळे काही आंदोलक जागीच कोसळल्याचेही पहायला मिळाले. यआंदोलकांत बहुतांश महिला आहेत. अश्रूधुराच्या माऱ्यामुळे आंदोलक बेशुद्ध पडल्याचा आरोप आंदोलनात सहभागी महिलेने केला आहे. ही जमीन कोकणची आहे. जर तुम्हाला मारायचेच असेल तर आम्हाला मारा, तुम्हाला हवे ते करा. आम्ही काहीही झाले तरी डगमगणार नाही, असा निर्धार आंदोलक बोलून दाखवत आहेत. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात लाठीमार झालाच नाही!

बारसूमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र बारसू भागात सध्या शांतता आहे. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आलेला नसल्याचे म्हटले आहे.

स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प आणून त्यांच्यावर अन्याय करणार नाही. ग्रामस्थांवर अन्याय करून प्रकल्प पुढे न्यायचा नाही, अशी सरकारची भूमिका आहे. या प्रकल्पाला येथील ७० टक्के लोकांचे समर्थन आहे. काही लोक स्थानिक होते, काही लोक बाहेरचे होते. कोणतेही काम जबरदस्तीने होणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पण उद्योगमंत्री म्हणतात बारसूत तणाव

बारसूमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती निर्माण करण्यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. सकाळी खा. विनायक राऊत मोर्चा काढण्याच्या तयारीत होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता ग्रामस्थांनी मोर्चा काढला. येथील ग्रामस्थ चर्चा करायला तयार होते. आजही त्यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू होती. पण आज बाहेरची माणसे आणून परिस्थिती चिघळवण्यात आली, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

दिल्लीतल्या मोगलांच्या सांगण्यावरून लाठीचार्ज-राऊत

बारसूमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील मोगलांच्या सांगण्यावरून बारसूमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बारसूमध्ये दिल्लीतील मोगलांच्या आदेशानेच कारवाई सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.

…ही तर राक्षसी राजवट-आव्हाड

आपल्या हौसेखातर खारघरमध्ये १४ बळी घेण्यात आले. आता रिफायनरी नको म्हणून बारसू पंचक्रोशीतील सर्वच गावे भांडत आहेत. तरीही लाठीचार्ज, अश्रूधूर असे प्रकार केला जात आहेत. ही तर राक्षसी राजवट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या आंदोलकांचे नशीबच की त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!