UGC-NET: यूजीसी-नेट परीक्षेतही घोटाळा: ‘या’ तीन विषयांची परीक्षाच रद्द, फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर; आधीची परीक्षा रद्द होण्याचे कारण काय?, वाचा सविस्तर तपशील


नवी दिल्लीः नीट पेपरफुटीसह देशातील विविध स्पर्धा परीक्षांतील घोटाळे गाजत असताना आणि त्यावरून देशभरात विद्यार्थी आंदोलने करत असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) जून २०२६ मध्ये झालेल्या नेट (UGC-NET) परीक्षेतही घोटाळे झाल्याचे उघडकीस आल्यामुळे नॅशन टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयाची आधी झालेली परीक्षा रद्द करून या तिन्ही विषांची फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे.  त्यामुळे देशातील अनेक महत्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या क्षमता आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सहायक प्राध्यापकपदासाठीची पात्रता, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि पीएच.डी.च्या प्रवेशासाठी यूजीसी-नेट ही महत्वाची परीक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २२ ते ३० जून २०२६ दरम्यान ८७ विषयात ही परीक्षा घेतली होती. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या पेपरमध्ये असंख्य चुका असल्याच्या अनेक तक्रारी एनटीएकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एनटीएने चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीला तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून या शिफारशींनुसार इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय एनटीएने जाहीर केला आहे.

देशातील अनेक महत्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर गेल्या काही महिन्यांपासून परीक्षांतील अनियमितता, पेपरफुटीचे गंभीर आरोप केले जात आहेत. परीक्षांतील घोटाळ्यांमुळे एनटीएची विश्वासार्हता आणि क्षमतेवरच सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असतानाच यूजीसी-नेट परीक्षेतील हा घोटाळा समोर आला आहे. यापूर्वी नीट पेपरफुटीच्या वादामुळे दिल्लीतील जंतर-मंतरसह विविध राज्यांत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यंदाच्या यूजीसी-नेट परीक्षेतील घोटाळ्याचे स्वरुप पेपरफुटी घोटाळ्यापेक्षा वेगळे असले तरी गेल्या काही वर्षांपासून यूजीसी-नेट परीक्षेला लागलेले ग्रहण यामुळे अधिकच वाढले आहे.

का रद्द झाली आधीची परीक्षा?

एनटीएने घेतलेल्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयाच्या यूजीसी-नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक तथ्यात्मक, टंकलेखन, भाषांतर चुका आढळून आल्या. या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रख्यात विद्वानांच्या नावाचे  चुकीचे स्पेलिंग, पुस्तकांच्या शिर्षकांची चुकीची, प्रश्नांच्या मूळ शब्दरचनेत चुका, व्याकरणाच्या चुका, लिंग आणि वचनाच्या जुळणीत चुका, विरामचिन्हांच्या चुका आणि प्रस्थापित संकल्पनांसाठी अप्रमाणित नवीन संज्ञांचा वापर असे अनेक घोटाळे झाल्याचे एनटीएने स्थापन केलेल्या चौकशी समितीला आढळून आले. या तिन्ही विषयांच्या परीक्षेत यापूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेल्याच प्रश्नांची मोठ्या संख्येने पुनरावृत्ती झाल्याचेही चौकशी समितीला आढळून आले. ‘निष्पक्ष आणि त्रुटीरहित परीक्षा’ व्हाव्यात म्हणून या तिन्ही विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात याव्यात, अशी शिफारस या चौकशी समितीने केली होती.

चौकशी समितीच्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर अशा त्रुटी असलेल्या प्रश्नपत्रिका  निष्पक्षता आणि त्रुटीरहित परीक्षेच्या मानकांची पूर्तता करत नाहीत आणि आव्हानात्मक प्रक्रियेनंतर केवळ प्रश्न वगळून इतक्या मोठ्या प्रमाणातील त्रुटी दूर केल्या जाऊ शकत नाहीत, असा निष्कर्ष एनटीएने काढला आणि इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांतील यूजीसी-नेट फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी जाहीर केला.

आता फेरपरीक्षा कधी?

एनटीएने यूजीसी-नेट परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ते फेरपरीक्षेचे वेळापत्रक असे
इंग्रजीः ९ सप्टेंबर २०२६, पहिले सत्र- सकाळी ९ ते दुपारी १२.०० वा.
वाणिज्यः ९ सप्टेंबर २०२६, दुसरे सत्र- दुपारी ३ ते ६. वा.
समाजशास्त्रः १० सप्टेंबर २०२६, पहिले सत्र- सकाळी ९ ते दुपारी १२ वा.

या तिन्ही विषयांची फेरपरीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. शहर, परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र आदींबाबतचा सविस्तर तपशील एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या जाहीर केला जाईल, असे एनटीएने म्हटले आहे.

इतर ८४ विषयांच्या निकालाचे काय?

एनटीने इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र हे तीन विषय वगळून अन्य ८४ विषयांच्या आन्सर की १६ ऑगस्ट रोजी सकाळीच जाहीर केल्या आहेत. या ८४ विषयाच्या परीक्षांचे निकाल वेळापत्रकानुसार जाहीर केले जातील. या तीन विषयांच्या फेरपरीक्षेमुळे इतर ८४ विषयांसाठी जेआरएफच्या जागांचे वाटप, सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता आणि पीएचडी प्रवेशासाठी ई-प्रमाणपत्रे जारी करण्यास कोणताही विलंब होणार नाही, असे एनटीएने म्हटले आहे.

सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या जून २०२६ मध्ये झालेल्या किंवा पुनर्परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या (जी संख्या जास्त असेल ) संख्येच्या ६ टक्के असेल. इंग्रजी, वाणिज्य व समाजशास्त्र या तीन विषयांसाठी जेआरएफ, सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता आणि पीएचडी प्रवेशासाठीची पात्रता यांचे विषयनिहाय वाटप माहिती पत्रकात नमूद केल्याप्रमाणेच केले जाईल. पुनर्परीक्षेनंतर प्रत्येक विषयासाठी आधीच वाटप केलेल्या संख्येत कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही, असेही एनटीएने म्हटले असून एनटीए निष्पक्ष, अचूक आणि पारदर्शक परीक्षा आयोजित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा दावाही केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!