
नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना ‘दिमानी नक्षलवादी’ या शब्दाचा वापर केला. ‘दिमागी नक्षलवाद्यां’पासून सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यांना वेगळे पाडले जाईल, असा इशारा प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षलवादी’ ही संज्ञा नेमकी कोणासाठी वापरली? याबाबत काहीही स्पष्ट सांगितले नसले तरी मोदींनी वापरलेल्या या संज्ञेमुळे ऐन स्वातंत्र्यदिनीच नव्या वादाला तोंड फुटले आहे.
विशेष म्हणजे देशातील उजव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांनी विरोधी पक्षनेते, देशातील सरकारविरोधी पत्रकार, रंगकर्मी, लेखक, कवि- शायर, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक इत्यादींना अर्बन ‘नक्षलवादी’ संबोधले होते. उजव्या विचारसणीच्या कट्टरतावाद्यांनीच देशात ‘अर्बन नक्षलवादी’ ही संज्ञा जन्मास घातली आणि ती व्यवहारात प्रचलित केली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार स्वतः मोदींनीही ‘अर्बन नक्षलवादी’ ही संज्ञा वापरली होती. आता त्यांनीच स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ‘दिमागी नक्षलवादी’ ही संज्ञा वापरली आहे. मोदींनी ‘दिमागी नक्षलवादी’ नेमके कोणाला म्हटले? विरोधी पक्ष आणि सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना की आणखी कोणाला? याबाबत त्यांनी काहीच स्पष्ट केले नसले तरी त्यांच्या या भाषणावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नेमके काय म्हणाले मोदी?
लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या ७६ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले की, सशस्त्र नक्षलवादी तर गेले परंतु दिमागी नक्षलवादी संधीच्या शोधात आहेत. समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यासाठी ते वेगवेगळी कामे करू लागली आहेत. असे लोक हिंसा आणि अराजकतेचे मार्ग शोधू लागले आहेत. या दिमागी नक्षलवाद्यांना ओळखावे लागेल, त्यांना वेगळे पाडावे लागेल आणि विकसित राष्ट्र करण्यासाठी देशातील युवा पिढीला जोडावे लागेल, असे मोदी म्हणाले.
जंगलात शस्त्र उचललेल्या नक्षलवाद्यांना जरी संपवण्यात आले असले तरी देशाच्या विविध भागांमध्ये ‘दिमानी नक्षलवादी’ आहेत. जंगली नक्षलवाद्यांची जागा आता शहरे, शिक्षण संस्था आणि बौद्धीक मंचावर सक्रीय असलेले ‘दिमागी नक्षलवादी’ घेत आहेत. हे दिमागी नक्षलवादी थेट शस्त्रे उचलत नाहीत, परंतु आपल्या विचारसरणीच्या जोरात देशात अराजकता आणि भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ‘ओळखण्याची आणि वेगळे पाडण्याची’ गरज आहे, जेणेकरून विकसित भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात देशातील तरूणांना जोडता येईल, असे मोदी म्हणाले.
वर्षानुवर्षे माओवादी विचारसरणीचे लोक सार्वजनिक जीवनात, एवढेच नव्हे तर सरकारी समित्यांमध्ये सल्लागारांच्या भूमिकेत होते. या विचारसरणीने विविध संस्था आणि उपक्रमांना प्रभावित केले होते. आपण ‘हाथरिया नक्षलवाद्यां’चा (सशस्त्र नक्षलवाद्यांचा) नायनाट करणअयात आणि देशाला त्यांच्यापासून मुक्त करण्यात यशस्वी झालो आहोत, परंतु ‘दिमागी नक्षलवादी’ संधीच्या शोधात आहेत, हिंसेचे मार्ग शोधत आहेत आणि देशाला चुकीच्या मार्गावर खेचण्याचे डावपेच ते आखत आहेत, असेही मोदी म्हणाले.
नक्षलवाद, माओवादाने लाखो तरूणांची स्वप्ने उद्धवस्त केली, असंख्य मातांपासून त्यांचे पुत्र हिरावून घेतले, असंख्य मातांची स्वप्ने चिरडून टाकली. या नक्षलवादाने भारताच्या आणि लोकसंख्येच्या मोठ्या भागाला बंदुकीच्या धाकाने ओलीस ठेवले होते, त्यांनी संविधान उद्धवस्त केले होते. आता नक्षलवादात श्वास घेण्याचीही ताकद उरलेली नाही, हे जाहीर करताना मला आनंद होतो, असे मोदी म्हणाले.
मोदींच्या म्हणण्याचा अर्थ काय?
मोदींनी आपल्या भाषणात ‘दिमागी नक्षलवादा’ची कोणतीही औपचारिक किंवा कायदेशीर व्याख्या सांगितली नाही. त्यामुळे ‘दिमागी नक्षलवादी’ ही कोणत्याही कायदेशीर श्रेणीचे नाव नाही तर राजकीय आणि वैचारिक संदर्भात वापरलेला शब्द आहे. ज्या पद्धतीने नुकतेच कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले, जे देशभर झपाट्याने फैलावत चालले आहे. ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वच मंचावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले त्यामुळे सरकार हैरान आहे. जंतर-मंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीमार, पॅलेट गनचा वापर हा राहुल गांधींनी राष्ट्रीय मुद्दा केला. संसदेपासून रस्त्यावर हे प्रकरण चर्चिले गेले. त्यामुळे मोदी सरकार बॅकफूटवर गेले.
देशात ठिकठिकाणी होत असलेली विद्यार्थी आंदोलने, शाळांमध्ये होत असलेली जेन-अल्फाची आंदोलने आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची धारदार भाषणे ही सध्या मोदी सरकारसमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत. राहुल गांधींनी भारतातील जनतेची भीती घालवली. लोक आधी बोलायला घाबरत होते, परंतु आता ते सरकारच्या धोरणाविरुद्ध बोलू लागले आहेत, असे विश्लेषक सांगतात.
प्रधानमंत्र्यांनी विशिष्ट व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष किंवा सामाजिक समूहाचे नाव घेऊन ‘दिमागी नक्षलवादी’ कोण? हे सांगितले नसले तरी मोदी सरकार आंदोलनांमुळे घाबरलेले आहे, त्यामुळेच ‘दिमागी नक्षलवादी’ हे नवे खूळ काढून संघटित होत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
‘मोदी हे ‘मास्टर ऑफ ऍब्युजर’!
मोदींच्या ‘दिमागी नक्षलवादी’ संबोधनावर काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी टिकास्त्र सोडले आहे. ‘आधी त्यांनी आपल्या विरोधकांना ‘अर्बन नक्षलवादी’ म्हटले. आता ते त्यांना ‘दिमागी नक्षलवादी’ म्हणत आहेत. हे त्यांच्या हताशेचे निश्चित लक्षण आहे. हे तथाकथित ‘अर्बन नक्षलवादी’ किंवा आताचे ‘दिमागी नक्षलवादी’ ज्या काही मागण्या करतात किंवा ज्याचे समर्थन करतात, शेवटी मोदी तेच स्वीकारतात, हा भाग वेगळा. प्रधानमंत्री एमए आहेत आणि ते एंटायर पोलिटिकल सायन्समध्ये मास्टर ऑफ अब्युजर (शिव्या-शाप देणारे मास्टर) आहेत, हे उगीच नाही, असे जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दोन-तीन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री मोदींनी आपल्या राजकीय विरोधकांना ‘अर्बन नक्षलवादी’ संबोधले होते. तेव्हा संसदेत विचारण्यात आले की ‘अर्बन नक्षलवादा’ची व्याख्या काय आहे? त्यावर अर्बन नक्षलवादी काहीही नाही, त्याची कोणतीही व्याख्या नाही, असे उत्तर गृहमंत्री देतात. आज प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून आपल्या राजकीय विरोधकांसाठी दिमागी नक्षलवादाची भाषा वापरत आहेत, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
