बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात छत्रपती संभाजीनगर एसएससी बोर्डाच्या विभागीय सचिव वैशाली जमादार यांना अटक


नागपूरः  महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजजीनगर (औरंगाबाद) विभागीय बोर्डाच्या सचिव आणि नागपूरच्या माजी विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जमादार यांना आज अटक करण्यात आली. जमादार यांच्या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे आदेश तसेच शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशाची कोणतीही शहानिशा न करताच बनावट शालार्थ आयडी प्रदान करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी नागपूरचा विभागीय शिक्षण संचालक उल्हास नरड यांच्यासह पोलिसांनी काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक केली होती. त्यापैकी उल्हास नरड, निवृत्त विभागीय उपसंचालक अनिल पारधी यांना जामीन मंजूर झाला आहे. उल्हास नरड यांच्याआधी छत्रपती संभाजीनगर एसएससी बोर्डाच्या विभागीय सचिव वैशाली जमादार या नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक होत्या.

बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देणे, बनावट शालार्थ आयडी देणे, मान्य ठरावामध्ये फेरबदल करून खोटी नियुक्तीपत्रे देणे, खोटे रूजू अहवाल आणि खोट्या व बनावट नियुक्त्या, पदोन्नती दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी वैशाली जमादार यांना पोलिसांनी नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले होते.

छत्रपती संभाजीनगर विभागीय बोर्डाअंतर्गत एसएससी व एचएससीच्या परीक्षा सुरू असल्याचे कारण देत वैशाली जमादार यांनी चौकशीला सामोरे जाणे टाळले होते. त्यामुळे नोटीस बजावल्यानंतरही त्यांची चौकशी झालीच नव्हती. अखेर शुक्रवारी (२३ मे) रोजी जमादार यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घोटाळ्यात अटक होणाऱ्या वैशाली जमादार या पहिल्याच उच्चपदस्थ महिला अधिकारी असून त्यांच्या अटकेमुळ शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून आता पुढचा नंबर कोणाचा? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!