UPSC ची मोठी कारवाईः वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द, भविष्यात यूपीएससीच्या परीक्षा देण्यावरही निर्बंध


नवी दिल्लीः आपले वर्तन आणि मनमानी मागण्या करून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून भविष्यात यूपीएससीची कोणतीही परीक्षा देण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

 पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना केलेल्या गैरवर्तनामुळे महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या महिनाभरापासून चर्चेत आल्या आहेत. त्यानंतर चुकीची माहिती आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे यूपीएससीची फसवणूक करून त्यांनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. आता यूपीएससीने त्यांची थेट उमेदवारी रद्द करून भविष्यात त्यांना यूपीएससीची कोणतीही परीक्षा देण्यावर बंदी घातली आहे.

यूपीएससीने पूजा खेडकर यांचे २००९ ते २०२३ या काळातील सर्व रेकॉर्ड तपासून पाहिले आहे. पूजा खेडकर यांना नागरी सेवा परीक्षा नियम २०२२ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच यापुढील काळात यूपीएससीकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही,’ असे यूपीएससीकडून सांगण्यात आले आहे.

पूजा खेडकर यांच्यावर आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करताना गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सनदी सेवेत निवड होण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर केली. त्यांच्या वडिलांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असतानाही त्यांनी क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद पदरात पाडून घेतले. तसेच त्यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्रामध्येही अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!