
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बनावट आणि खोट्या पदव्या तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी. ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी अटक केलेले आरोपी आणि कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान, सहसचिव आस्मा खान आणि अन्य एक आरोपी शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सबीना मलिक यांनी जामीन मंजूर केला.
आस्मा इद्रिस खान आणि पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून एम.फिल. ची बनावट व खोटी पदवी तयार करून त्याआधारे २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता. या प्रकरणी रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या दोघांच्याही एम.फिल. पदव्यांची पडताळणी केली होती.
आस्मा खान व मकसूद खान हे आमच्या विद्यापीठाचे कधीही विद्यार्थी नव्हते. आमच्या विद्यापीठात एम.फिल.चा अभ्यासक्रमच चालवला जात नाही आणि या दोघांनी आमच्या विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून एम.फिल. च्या बनावट व खोट्या पदव्या तयार केल्या आहेत, असे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने लेखी कळवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील विद्यावाचस्पती विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी २६ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी आस्मा खान व मकसूद खानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३(५), ३१८(२), ३१८(४), ३३६(३) आणि ३४०(२) आणि अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आस्मा इद्रिस खान हिला ३० मार्च रोजी अटक केली होती. आस्मा खान हिच्या चौकशीत कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व आस्मा खान हिचा पती डॉ. मझहर खान हाच बनावट पदवी घोटाळ्याचा मास्टर माइंड असल्याचे समोर आल्यानंतर मझहर खानलाही पोलिसांनी ७ एप्रिल रोजी अटक केली होती. तर पठाण मकसूद खान याने अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यानंतर कोल्हापूर विद्यापीठाच्या बनावट पदव्यांच्या आधारे कोहिनूर महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षकाची नोकरी मिळवल्याप्रकरणी पोलिसांनी शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान आणि कोहिनूर महाविद्यालयाचे विद्यापीठाने मान्यता रद्द केलेले प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे या दोघांना १९ एप्रिल रोजी अटक केली.
अटकेनंतर हे सर्व आरोपी काही दिवस पोलिस कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन अर्ज फेटाळल्यामुळे हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. या चार आरोपींपैकी आस्मा इद्रिस खान, डॉ. मझहर खान आणि शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सबिना मलिक यांच्या न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्या. मलिक यांनी काल (१५ मे) या तिघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
आरोपींनी माहितगारांवर दबाव आणू नये किंवा कोणत्याही प्रकारे अभियोजन पक्षाच्या साक्षीदारांशी छेडछाड करू नये, आरोपींनी अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होऊ नये, आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकाऱ्याने बोलावले तेव्हा आरोपींनी संबंधित पोलिस ठाण्यात उपस्थित रहावे, आरोपींनी त्यांच्या निवासाचा अधिकृत पुरावा सादर करावा अशा अटींवर आस्मा खान, मझहर खान आणि शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानला प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

